गर्भाशय शस्त्रक्रियांसाठी पूर्वअनुमतीचा ‘बीड पॅटर्न’ आता राज्यभर लागू !

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या सूचना

बीड – गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची पूर्वअनुमती घेणे बीड जिल्ह्यात बंधनकारक आहे. आता राज्यभर हा ‘बीड पॅटर्न’ लागू करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी दिल्या आहेत. यासमवेतच ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी आणि कारखाना स्थळावर मिळणार्‍या सोयी-सुविधा यांचीही पडताळणी करण्याचे निर्देश गोर्‍हे यांनी दिले. ‘ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी आणि गर्भाशय शस्त्रक्रिया’ या विषयावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आरोग्य आयुक्त डॉ. नितीन अंबाडेकर, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांच्यासह सर्व जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची ‘ऑनलाईन’ उपस्थिती होती. बीडमध्ये वर्ष २०१९ मध्ये महिलांच्या अज्ञानाचा अपलाभ घेऊन आवश्यकता नसतांनाही काही खासगी डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकत असल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर नीलम गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.