मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी दिला ! – संजय शिरसाट, आमदार

संजय शिरसाट

संभाजीनगर – मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसला, तरी विकासकामे अडून न रहाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमवेत आलेल्या अनुमाने ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. वर्ष २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी मिळेल. बंडखोरांना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरता येण्यासाठी बळ दिले जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ६ ऑगस्ट या दिवशी एका दैनिकाशी बोलतांना दिली.

ते म्हणाले की, लोकांची कामे केल्यानंतरच मतदान होईल, एवढे साधे गणित आहे. ते आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतत सांगत होतो; पण त्याचा उपयोग होत नव्हता. नव्या मुख्यमंत्र्यांना ते सांगण्याची आवश्यकता पडली नाही. त्यांनी स्वत:हून प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे ४० आमदारांच्या मतदारसंघांमध्ये येत्या मासांत काही कामे चालू झाल्याचे निश्चित दिसेल. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन ९ ऑगस्ट या दिवशी मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. त्यात माझा समावेश असेल. ‘समाजकल्याण विभाग किंवा संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मिळेल’, अशी अपेक्षा आहे.