ठाणे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालयाचे काम १५ दिवसांत चालू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

ठाणे जिल्ह्यधिकारी कार्यालयातील बैठक

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे ‘सुपर स्पेशालिटी’ रुग्णालय उभारण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना विनामूल्य दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत; मात्र रुग्णालय उभारणीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेद व्यक्त केला. ‘येत्या १५ दिवसांत निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ करा’, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ६ जुलै या दिवशी ठाणे जिल्ह्यधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या रुग्णालयात न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी, आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी आणि कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी अन् डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत, तसेच कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार आहे. या प्रस्तावानुसार रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह, इमारतीचे बांधकाम यांसाठी राज्यशासनाने ५२७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी संमत केला आहे.