पंढरपूर येथे १५० किलो भेसळयुक्त पेढे जप्त !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पेढ्यामध्ये ‘स्टार्च’ भेसळ आढळल्याने १५० किलो पेढे ५ जुलै या दिवशी अन्न सुरक्षा स्वयंसेवक, तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जप्त केले. या प्रकरणी पिरगौडा शिवपत्र कोट्टली या व्यापार्‍यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आषाढी वारीनिमित्त भेसळयुक्त पेढ्याची विक्री केली जात असल्याची माहिती सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर आणि उमेश भुसे यांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर येथील पश्चिमद्वार परिसरातील अस्थायी पेढीची पडताळणी करण्यात आली. पेढीत विक्रीस ठेवण्यात आलेल्या पेढ्यांचा संशय आल्याने पेढ्यात आयोडीन टाकून पाहिले असता त्यात ‘स्टार्च’ या अन्नपदार्थाची भेसळ असल्याचे आढळले. पेढ्याचे ३ अनौपचारिक अन्न नमुने घेऊन १५० किलो पेढे जप्त करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

पवित्र अशा तीर्थक्षेत्री भेसळयुक्त पेढा विकण्याची बुद्धी होणार्‍यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे. हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळे भेसळ केलेले अन्नपदार्थ विकल्याने काय होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. यासाठी धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे !