मुंबई महापालिकेच्या मंडईमधील दुर्घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यास आयुक्तांचा नकार !

आयुक्त इक्बाल सिंह चहल

मुंबई – माझगाव येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण मृत्यूमुखी पडले होते. ही दुर्घटना होऊन ९ वर्षे उलटूनही आरोपी असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यास पालिकेच्या आयुक्तांनी नकार दिला. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले. या प्रकरणी कार्यकारी अभियंता पटेल यांच्यासह ४ अभियंत्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना जामिनावर सोडण्यात आले होते.

या दुर्घटनेत तत्कालीन कार्यकारी अभियंता महेंद्रकुमार पटेल किंवा अन्य अधिकारी यांचा गुन्हेगारी हेतू होता, हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही, असे महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी फौजदारी कारवाईसाठी संमती नाकारतांना नमूद केले आहे. संमतीअभावी पटेल यांच्यावर कारवाई करणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

महापालिकेची ५ मजली बाबू गेनू मंडईची इमारत २७ सप्टेंबर २०१३ या दिवशी सकाळी ६ वाजता कोसळली होती. त्यात ६१ जणांचा मृत्यू, तर ३२ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

कर्तव्यात कसूर करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच अन्य कर्मचार्‍यांना जरब बसेल.