संभाजीनगर येथील आकाशवाणीच्या निर्णयाचा ५० हौशी कलावंतांना फटका !

संभाजीनगर – येथील आकाशवाणीच्या केंद्रात कंत्राटी उद्घोषक म्हणून अनुमाने ५० ते ६० जण काम करतात. यात बहुतांश महिला कलावंतांचा समावेश आहे. आता प्रतिदिन स्थानिक पातळीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आठवड्यातून एकदा किंवा देशपातळीवर एकाच ठिकाणाहून प्रसारित करण्याचा निर्णय आकाशवाणीने घेतला आहे. या कंत्राटी उद्घोषकांना मिळणार्‍या कामावर या निर्णयाचा परिणाम झाला असून त्यांचे उत्पन्नही घटणार आहे. कार्यक्रमांची संख्या मर्यादित केल्याने, तसेच महत्त्वाचे २ कार्यक्रम बंद केल्याने या महिला कलावंतांना मिळणारे ८ ते १० सहस्र रुपयांचे मानधनही बंद झाले आहे. कार्यक्रमांची संख्या मर्यादित झाल्याने अवघे १ सहस्र ६०० ते ३ सहस्र ४०० रुपये कलावंतांना मिळतात.

हौस म्हणून काम करणार्‍यांचा रोजगार बुडणार नाही ! – केंद्रप्रमुख, आकाशवाणी, संभाजीनगर

संभाजीनगर येथील आकाशवाणीचे केंद्रप्रमुख जयंत कागलकर म्हणाले, ‘‘आकाशवाणीत काम करणारे कंत्राटी कलावंत हे हौस म्हणून काम करतात. अनेक महिला अर्धवेळ (पार्ट टाईम) हे काम करतात. त्यामुळे हे कार्यक्रम बंद झाल्याने कुणाचाही रोजगार बुडाला असे होत नाही. शिवाय काही कार्यक्रम पूर्णपणे बंद झालेले नाहीत. त्यांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. काही कार्यक्रम अल्प केले असले, तरी श्रोत्यांसाठी दुसरे कार्यक्रम दिले जाणार आहेत. ते कार्यक्रमही दर्जेदार असणार आहेत. त्यामुळे श्रोत्यांची नाळ तुटण्याचा प्रश्नच येणार नाही. हे कार्यक्रमही श्रोत्यांना आवडतील यात शंका नाही.’’