परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कठीण काळातही प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (वय ६१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सौ. सुनंदा जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) या सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या पत्नी आहेत. त्या रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतात. त्यांनी सद्गुरु जाधवकाकांना व्यवहार आणि साधना यांत मोलाची साथ दिली. त्यांनी अनेक प्रसंगांत गुरुकृपा अनुभवली. २५.६.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणे आणि अन्य सूत्रे’ यांविषयी जाणून घेतले. आज उर्वरित भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/591463.html

परात्पर गुरु डॉ. आठवले

७. कर्करोगाच्या गंभीर आजारपणातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाता येणे आणि त्या कालावधीत त्यांची प्रीती अन् कृपा अनुभवणे

मला पूर्वीपासून पोटदुखीचा त्रास होता. माझी साधना जशी वाढत गेली, तसा तो त्रास न्यून झाला. नोव्हेंबर २०११ मध्ये मला ‘कर्करोग झाला आहे’, असे निदान झाले. सर्व तपासण्या झाल्यावर शस्त्रकर्म करण्याचे ठरले. त्या परिस्थितीत गुरुदेवांनी मला स्थिर ठेवले. माझे शस्त्रकर्म असतांना माझ्या समवेत माझी मुलगी आणि एक साधक होता. मी व्यवहारात असते, तर ‘माझ्या समवेत जवळचे नातेवाईक हवेत’, असे मला वाटले असते. गुरुदेवांची केवढी कृपा ! तेच मला शक्ती देत होते. रुग्णालयातील प्रत्येक प्रसंगात ते सूक्ष्मातून माझ्या समवेत होते; म्हणून मला काहीही त्रास जाणवला नाही. तेव्हा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहात होते. परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांनी माझी सर्वतोपरी काळजी घेतली. त्या वेळी मला गुरुदेवांची प्रीती अनुभवायला मिळाली. गुरुदेव प्रतिदिन माझ्या प्रकृतीची विचारपूस करून मला प्रसाद पाठवत असत. मला जे जे हवे, ते ते सर्व घ्यायला सांगत. ‘मला कसलाही त्रास होऊ नये’, यासाठी त्यांनी नियोजन केले होते. अनुमाने एक मासाने यजमान (सद्गुरु काका) मला भेटण्यासाठी रामनाथी आश्रमात आले. शस्त्रकर्म आणि ‘केमोथेरपी’ यांमुळे माझ्या डोक्यावरचे सर्व केस गेले होते. मी त्या स्थितीतही स्थिर होते.

सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सौ. सुनंदा जाधव

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती

८ अ. यजमानांच्या ‘संतसन्मान सोहळ्या’च्या वेळी : जून २०१२ मध्ये यजमान संतपदी विराजमान झाले. त्यांचा संतसन्मान सोहळा अमरावती येथे झाला. आम्ही रामनाथी आश्रमातून ‘ऑनलाईन’ जोडलो होतो. तो सोहळा २ ते अडीच घंटे चालला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही तो सोहळा पाहिला. यजमान संत झाले; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यासाठी (मी आणि मुलगी गायत्री हिच्यासाठी) आंब्याचे आईस्क्रीम पाठवले आणि ‘पोटभर खा’, असा निरोप दिला. त्यांनी दुसर्‍या दिवशीही आमची विचारपूस केली.

८ आ. ‘अँजिओप्लास्टी’च्या वेळी : सप्टेंबर २०१८ मध्ये माझी ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाकडे रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यासाठी केलेले शस्त्रकर्म) झाली. मी शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात जाण्याआधी गुरुदेवांनी माझ्याशी भ्रमणभाषवरून बोलून मला चैतन्य दिले. त्या वेळी सद्गुरु काका आले होते. मी त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांची प्रीती अनुभवली.

९. घरी एकटी असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवणे

‘आपण साधना केली की, देव आपली सर्वतोपरी काळजी घेतो’, याची मी प्रचीती घेतली. सद्गुरु काका सेवेसाठी विदर्भ आणि मराठवाडा येथे जात होते. माझ्या मुली कु. अनुराधा आणि सौ. गायत्री या अन्य जिल्ह्यांत प्रसारासाठी जात होत्या. मी एकटीच घरी असायचे; पण मला कधी भीती वाटली नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत’, असेच मला जाणवायचे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा सर्व कुटुंबियांकडून सेवा करवून घेतली. त्यांच्या कृपेमुळेच कठीण काळातही आम्ही सर्व जण प्रतिदिन आनंदाची अनुभूती घेत होतो. आम्ही मायेत असतो, तर एवढे सहन करणे कठीण झाले असते. गुरुदेवांची शक्ती आणि प्रीती यांमुळे आम्ही सर्व सहन करू शकलो. त्याबद्दल आम्ही गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सौ. सुनंदा नंदकुमार जाधव (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६१ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.४.२०२२)

(समाप्त)