पुरातत्व विभागाच्या आदेशाला न जुमानता शेकडो पर्यटक गडांवर मुक्कामी रहात असल्याने गडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न !

पर्यटक राहताहेत गडांवर मुक्कामी

वेल्हे (जिल्हा पुणे) – राज्य संरक्षित स्मारकांवर कुणालाही मुक्काम करता येणार नसल्याचे पुरातत्व विभागाकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले असून तसे लेखी निर्देशही दिले आहेत; मात्र तरीसुद्धा अनेक पर्यटक राजगड आणि तोरणा या गडांवर मुक्कामी रहातात. यात काही उपद्रवी पर्यटकांमुळे गडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे; मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा पुरातत्व विभागाकडे उपलब्ध नाही. गडभ्रमंतीसाठी जाणाऱ्या हौशे-नवशे यांचे प्रमाण अधिक वाढल्याने गडांवरील अपघात आणि उपद्रव या घटना वाढल्याचे चित्र काही वर्षांत दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी गडावर मुक्कामी रहाण्यास प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक नागरिक, वन विभाग आणि प्रशासन यांनी पुढे येणे आवश्यक आहे.

मुक्कामी रहाणाऱ्या पर्यटकांतील काही उपद्रवी पर्यटकांमुळे गडांवरील अवशेषांची हानी होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मागील वर्षी तोरणा गडावरील तटबंदीच्या संवर्धन कार्याची काही उपद्रवी पर्यटकांमुळे पडझड झाली होती. त्यानंतर पुन्हा गडांवर मुक्कामी रहाता येणार नसल्याचे निर्देश पुरातत्व विभागाकडून देण्यात आले होते. तरीसुद्धा शेकडो पर्यटक या गडांवर मुक्कामी असल्याचे दिसून येते. त्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून विकास आराखड्यामध्ये या सूत्रासाठी तरतूद होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले.

पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे यांनी सांगितले की, पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार सायंकाळच्या वेळी गडावरील पर्यटकांना गडावरून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या जातात; परंतु काही अतीउत्साही पर्यटकांकडून आम्हालाच दमदाटी केली जाते. त्यासाठी गडावर पोलिसांची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

देशातील महत्त्वाची स्मारके, पुरातन वास्तू, तसेच अवशेष यांचे संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले आहे; मात्र हे दायित्व पार पाडण्यास पुरातत्व विभाग अपयशी ठरत आहे. ज्या कारणासाठी एखादा विभाग स्थापन झाला असेल, त्याची ध्येयपूर्तीच होत नसेल, तर हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?