पैगंबरांच्या अवमानविषयीचा वाद हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न ! – बांगलादेश

बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री हसन महमूद

ढाका (बांगलादेश) – महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या अवमानकारक विधानाचा उद्भवलेला वाद, हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर बांगलादेश सरकारने प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे काही कारण नाही. हे बांगलादेशसाठी बाहेरचे सूत्र आहे. तो भारताचा प्रश्‍न आहे, बांगलादेशचा नाही. यावर आम्हाला काहीही बोलायचे नाही, असे विधान प्रतिक्रिया बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री हसन महमूद यांनी केले. ढाका येथे भारतीय पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेच्या वेळी त्यांनी हे विधान केले. या प्रकरणात योग्य कार्यवाही केल्यासाठी त्यांनी भारतातील अधिकार्‍यांचे अभिनंदन केले. ‘हा वाद आम्ही वाढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य इस्लामी देशांनी या प्रकरणी भारताकडे तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असतांना बांगलादेश तडजोडीचे धोरण स्वीकारत आहे का ? , अशी विचारणा महमूद यांना केली असता, ते म्हणाले की, पैगंबरांचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही; पण भारत सरकारने यात योग्य कारवाई केली आहे, तेथील कायद्यानुसार पुढेही कारवाई होईल. त्यामुळे आम्ही या प्रकरणात तडजोड करत आहोत, असे म्हणता येणार नाही.

संपादकीय भूमिका 

याचा अर्थ ‘बांगलादेशातील हिंदूंवरील, त्यांच्या मंदिरांवरील मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, हा बांगलादेशमधील अंतर्गत वाद आहे’, असे भारताने म्हणावे, असे होऊ शकत नाही. तो हिंदूंवर झालेला अत्याचार आहे. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारत सरकारने याविषयी नेहमीच बोलले पाहिजे आणि बांगलादेशावर हिंदूंचे रक्षण करण्यासाठी दबाव आणला पाहिजे !