‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील १०० जणांनी केली परंडा येथील भुईकोट गडाची स्वच्छता !

पर्यावरणदिनाच्या निमित्ताने…

परंडा (जिल्हा धाराशिव) – पर्यावरणदिनाच्या निमित्ताने येथील ऐतिहासिक भुईकोट गडाच्या ठिकाणी ‘राजा शिवछत्रपती’ परिवारातील एकूण १०० जणांनी ५ जून या दिवशी स्वच्छता अभियान राबवून गड संवर्धनाचा संदेश दिला. या वेळी गडातील विविध भागांत पर्यटकांनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि साचलेला कचरा, तसेच पुरातन बारवात पडलेला कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. ‘छत्रपती शिवराय’, ‘हर हर महादेव’चा जयघोष करत गडाची स्वच्छता करण्यात आली.

परंडा येथील भुईकोट गड हा मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या गडाची सर्वदूर ओळख आहे. गडात मौल्यवान पंचधातू आणि मोठ्या आकाराच्या लोखंडी तोफा आहेत. २६ बुरुजांची भक्कम तटबंदी असलेल्या या गडात अनेक प्राचीन अवशेष आढळतात. मागील २ वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भुईकोट गड बंद होता. त्यामुळे आतील सर्व भागांत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे वाढल्याने गड झाकोळून गेला होता. (अन्य संघटनांना पुढाकार घेऊन गडाची स्वच्छता करावी लागते, हे पुरातत्व विभागासाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)