आगरा येथे किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात दगडफेक !

आगरा (उत्तरप्रदेश) – राज्यातील कानपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ५ जून या दिवशी आगरा येथील वातावरणही बिघडले. आगरा येथील ताजगंजच्या बसई खुर्द येथे दुचाकी वाहनांच्या किरकोळ धडकेनंतर हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये हाणामारी अन् जोरदार दगडफेक झाली. येथे फरशी बसवण्याचे काम चालू आहे.

येथे राहणारा सादिक हा दुचाकी वाहनावरून घरी येत होता. खोदकामामुळे त्याची दुचाकी समोरून येणार्‍या राधेश्याम नावाच्या व्यक्तीला धडकली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. तरुणांचे कुटुंबीयही तेथे पोचले. त्यांनी मारहाण करण्यास आरंभ केला. यानंतर दोन्ही बाजूचे लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी हस्तक्षेप करू हे प्रकरण चिघळण्यापासून रोखले.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुधीर कुमार म्हणाले की, हा दोन समुदायातील संघर्ष नाही. या घटनेत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

हिंसाचार कोण चालू करते, हे जगजाहीर आहे. अशांच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार असे प्रकार घडतात !