शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे आलेला नाही ! – भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

संभाजीनगर – औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते; मात्र औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतराचा कुठलाही प्रस्ताव केंद्रशासनाकडे आलेला नाही, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’, असे नामकरण करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये कराड म्हणाले, ‘‘कोणत्याही शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव आधी राज्याच्या विधानसभेत संमत करून मग केंद्र सरकारकडे अंतिम संमतीसाठी पाठवावा लागतो. शहराचे नाव पालटायचे असल्यास त्यास रेल्वे, हवाई वाहतूक, टपाल खाते आदी खात्यांची ‘ना हरकत’ लागते. माझ्या माहितीनुसार राज्य सरकारने अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही.’’