ज्योतिषशास्त्र हे जीवनासाठी दिशादर्शक ! – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, ५ जून (वार्ता.) – ज्योतिष हे अनुभवशास्त्र आहे. माझ्या आई-वडिलांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. ज्योतिषशास्त्रामुळे अनेकांचे शंकानिरसन तर होतेच, तसेच शिवाय समाजाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन भाजपचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माण तालुक्यातील श्रीक्षेत्र गोंदवले येथे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावर करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, पंचांगकर्ते मोहन दाते, प्रा. रमणलाल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिवेशनामध्ये राज्यातील नामवंत ज्योतिषशास्त्र अभ्यासकांची व्याख्याने झाली. या अधिवेशनाचे आयोजन वरुड येथील वेदमूर्ती नंदकुमार जोशी यांनी केले. श्रीक्षेत्र गोंदवले सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय अधिवेशन भरवल्याविषयी उपस्थित मान्यवरांनी वेदमूर्ती जोशी आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष कौतुक केले.