राज्यात विजेची मागणी वाढल्याने भारनियमन अटळ ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

पुणे – ‘महावितरण’ला ७५ टक्के वीज ही औष्णिक विद्युत् प्रकल्पातून उपलब्ध होते. सध्या कोळसा टंचाईमुळे ‘महावितरण’ला ६ सहस्र मेगावॅटची आवश्यकता भासत आहे. परिणामी ‘महावितरण’ला खुल्या बाजारातून महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी कारखाना शुगर इन्स्टिट्यूट शुगर मिल्स असोसिएशन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय साखर परिषदे’मध्ये बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, आजमितीस ६ मेगावॅटचा तुटवडा जाणवत आहे. सध्या विजेची मागणी २८ सहस्र मेगावॅटपर्यंत गेली आहे. त्यावर मात करण्यासाठी चालू असलेले ‘सहवीज प्रकल्प’ पूर्ण क्षमतेने कसे चालतील ? याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यातून निर्माण होणारी वीज शासनाला घेण्यास परवडते. खुल्या बाजारातील महागडी वीज घेण्यापेक्षा सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज स्वस्त असते.