पुण्यातील ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाविषयी मला काहीही माहिती नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाविषयी महापालिकेने मागच्या काळात निर्णय घेतला आहे. याविषयी वृत्तपत्रांमध्ये परस्परविरोधी वार्ता येत आहेत; मात्र मला याविषयी काहीही माहिती नाही. महापालिकेने माझ्या उपस्थितीमध्ये सादरीकरण केले, ते मी पाहिले आहे; परंतु पुनर्विकासाचा निर्णय कसा घेतला ? असे मी संबंधितांना विचारल्यानंतर ‘महत्त्वाच्या कलाकारांसह सर्वसमावेशक समितीची स्थापना केली असून ‘नियोजनानुसार ३ सभागृह, १ अ‍ॅम्फी थिएटर, वाहनतळ अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यात आहेत’, असे त्यांनी मला सांगितले. कोणताही निर्णय घेतांना त्याला दोन बाजू असतात; मात्र बहुमताचा आदर करून पुढे गेले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते चाकण येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘बालगंधर्व’ पुनर्विकासामध्ये एक इंचही बांधकाम व्यावसायिक नसेल ! – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, पुणे

शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय सर्व घटकांना विश्‍वासात घेऊन घेण्यात आला आहे. यामध्ये व्यापारी संकुल असेल, असा जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे; मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. पुनर्विकास प्रकल्पात एक इंचही बांधकाम व्यावसायिक कारणासाठी नसेल, असे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांनी त्यांची भूमिका पत्रकार परिषदेमध्ये मांडली.