कोल्हापूर खंडपीठासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चा !

मुंबई – मागील ३८ वर्षांपासून कोल्हापूरसह ६ जिल्ह्यांतील अधिवक्ता, पक्षकार, सामाजिक संघटना यांच्या खंडपिठाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळ देत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना या मागणीसंदर्भात ८ मार्च २०२२ या दिवशी पत्र पाठवले होते. ८ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पाठवलेल्या पत्राचा आशय घेत, या खंडपिठाची आवश्यकता समजावून सांगितली, तसेच ठाकरे यांनी दीपांकर दत्ता यांच्या भेटीच्या वेळी कोल्हापूर खंडपिठाविषयी सकारात्मक चर्चा केली. कोल्हापूरसह ६ जिल्ह्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करावे यासाठी शासन सकारात्मक आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि खंडपीठ कृती समिती यांच्या  शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले होते. वर्ष १९८४ मध्ये संभाजीनगर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाल्यानंतर राज्यातील दक्षिणेकडील प्रदेशात समाविष्ठ असणाऱ्या या ६ जिल्ह्यांतून ‘कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे’, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.