जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना

  • जम्मूमध्ये ६, तर काश्मीरमध्ये १ मतदारसंघ वाढला !

  • स्थलांतरीत काश्मिरी हिंदूंसाठी २ जागा राखीव

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी नेमलेल्या सीमांकन आयोगाने त्याचा अहवाल सादर केला आहे. यानुसार राज्यातील विधानसभेच्या एकूण ७ जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ८३ वरून ९० पर्यंत वाढणार आहे. वाढलेल्या ७ पैकी ६ जागा जम्मूमध्ये असणार आहेत, तर १ काश्मीरमध्ये असेल. तसेच स्थलांतरित काश्मिरी हिंदूंसाठी विधानसभेत २ जागा राखीव ठेवण्याचाही प्रस्ताव दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरसाठी २४ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वीही या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. आता हा अहवाल सरकारला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर राजपत्र अधिसूचनेद्वारे याची कार्यवाही  केली जाणार आहे. या अहवालामुळे आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या जम्मू भागात विधानसभेच्या ३७ जागा आहेत, तर काश्मीरमध्ये ४६ जागा आहेत. या अहवालाच्या कार्यवाहीनंतर जम्मूमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ४३ होईल, तर काश्मीर विभागात जागांची संख्या ४७ होईल. प्रथमच अनुसूचित जमातीसाठी ९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६ जम्मू विभागात आहेत, तर ३ काश्मीर विभागात आहेत.

पाकिस्तानने भारतीय राजदूतांकडे आक्षेप नोंदवला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या राजदूतांना बोलावून त्यांच्याकडे आक्षेप नोंदवला. पाकने म्हटले की, आम्ही पुनर्रचनेचा अहवाल फेटाळत आहोत. या पुनर्रचनेचा उद्देश मुसलमानांना नागरिकतेच्या हक्कापासून वंचित करण्याचा आणि त्यांना दुर्बल करण्याचा आहे.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, या पुनर्रचनेमागे भारतातील गुप्त योजना लपली आहे. याद्वारे मुसलमानांचे वर्चस्व न्यून करण्याचा प्रयत्न आहे. (पाकने फाळणीनंतर हिंदूंचे काय केले आणि सध्याही हिंदूंच्या संदर्भात काय चालू आहे, हे सांगायला हवे ! पाकने भारताला मुसलमानांच्या संदर्भात विचारणा करण्यापेक्षा चीनमध्ये मुसलमानांची काय स्थिती आहे, यावर बोलून दाखवण्याचे धाडस करावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकने भारताच्या निर्णयांच्या संदर्भात नाक खुपसू नये, असे भारताने पाकला खडसावले पाहिजे !