मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कार्ड’चे लोकार्पण !
मुंबई – यापुढे मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट यांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड’ या एकाच ‘कार्ड’द्वारे प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ एप्रिल या दिवशी ‘एक शहर, एक कार्ड’ या योजनेच्या अंतर्गत या ‘कार्ड’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना प्रवास विनामूल्य आहे; मात्र यापुढे खासगी शाळातील विद्यार्थ्यांना अल्पदरात प्रवास करता येणार आहे. इयत्ता ५ वी पर्यंत २०० रुपये, इयत्ता ६ वी ते १० वी २५० रुपये, तर इयत्ता ११ वी आणि १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी १ सहस्र २०० रुपयांचा मासिक मास देण्यात येईल, अशी माहिती या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.
आमचे हिंदुत्व ‘गदाधारी हिंदुत्व’ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
हिंदुत्व म्हणजे सोडून द्यायला नाही. जे आम्हाला हिंदुत्व शिकवतात त्यांनी हिंदुत्वासाठी काय केले ? राममंदिर बांधण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आमचे हिंदुत्व घंटाधारी नाही, तर आमचे हिंदुत्व हनुमानाच्या गदेप्रमाणे आहे. आमचे हिंदुत्व ‘गदाधारी हिंदुत्व’ आहे. हनुमान चालिसापठण करायला आमच्या निवासस्थानी यायला हरकत नाही; मात्र येण्याची एक पद्धत असते. कुणी दादागिरी करून येणार असेल, तर दादागिरी कशी मोडावी, हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला सांगितले आहे. हिंदुत्वाच्या नावाने आमच्यावर टीका करणार्यांना उत्तर देण्यासाठी मी लवकरच सार्वजनिक सभा घेणार आहे.