वैद्यकीय तपासणी केल्यावर आणि प्रशिक्षण दिल्यावर कर्मचारी सेवारत होणार
कणकवली – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस्.टी.चे) शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेले ५ मास कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या संपात सहभागी झालेले बहुतांश कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. सेवेत रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. नंतर कर्मचाऱ्यांना सेवा दिली जाईल.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी एस्.टी.चे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची कामगार संघटना समितीचे जिल्हाध्यक्ष अनंत रावले यांची भेट घेतली.
कामगार संघटनांच्या वतीने अनंत रावले यांनी बडतर्फ आणि निलंबित केलेले कामगार अन् संपात सहभागी झालेले कामगार यांच्यावर कोणती कारवाई होणार आहे, याविषयीची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या वेळी रसाळ यांनी ‘२२ एप्रिलपर्यंत सेवेत येणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे महामंडळाचे निर्देश आहेत. बडतर्फ कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी रीतसर अपील प्रविष्ट करावे. नियमानुसार अपिलावर सुनावणी होऊन त्यांनाही सेवेत घेतले जाईल’, असे स्पष्ट केले.