१६ घंट्यांनंतर मुंबईतील अपघातग्रस्त मार्गावरून रेल्वे वाहतूक पूर्ववत् चालू !

मुंबई – माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ १५ एप्रिलच्या रात्री झालेल्या रेल्वे अपघातामुळे रूळ आणि बाजूचे खांब यांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली होती. १६ घंटे अविरत दुरुस्तीचे काम केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत् चालू झाली आहे. माटुंगा स्थानकाजवळ पुद्दुचेरी एक्स्प्रेसने गदग एक्स्प्रेसला धडक दिल्याने पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले होते. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांब पल्ल्याच्या सेवेवरही झाला होता. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. लोकलगाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुष्कळ गर्दी झाली. अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रहित करण्यात आल्या. १६ एप्रिल या दिवशी सकाळी ११.१५ वाजता रेल्वे वाहतूक सुरळीत चालू झाली.