पानवळ-बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील श्रीरामपंचायतन मंदिरातील रामजन्मोत्सव !

‘पानवळ-बांदा येथील प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील श्रीरामपंचायतन मंदिरात प्रतिवर्षी रामजन्मोत्सव साजरा होतो. प.पू. दास महाराज, सद्गुरु सत्यवान कदम, पू. माई (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक), सनातन संस्थेचे साधक आणि पानवळ-बांदा पंचक्रोशीतील रामभक्त एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. ‘श्रीरामाची कृपा संपादन करण्यासाठी सर्व जण कसे प्रयत्न करतात ? आणि प.पू. दास महाराज यांचा दास्यभाव’ या संबंधीचा हा लेख परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करत आहे.

पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीरामपंचायतन मंदिरातील देवता

१. मारुतिरायाप्रमाणे सदैव श्रीरामाच्या दास्यभक्तीत रमलेले प.पू. दास महाराज !

श्रीमती वंदना करचे

१ अ. मारुतिरायाप्रमाणे दास्यभावात राहून श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात सहभागी झालेले श्रीरामभक्त प.पू. दास महाराज ! : मारुतिरायाला वेळ मिळाल्यावर तो लगेच रामनामात ध्यानस्थ व्हायचा. अगदी तसेच प.पू. दास महाराज यांच्या मुखात अखंड रामनाम असते आणि तेही रामनामाशी एकरूप झाले आहेत. रामनाम हाच प.पू. दास महाराज यांचा श्वास आहे. त्रेतायुगात मारुतिरायाने अखंड दास्यभक्ती करून प्रभु श्रीरामाची कृपा संपादन केली. त्याप्रमाणे कलियुगात श्रीरामस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात सर्वतोपरी सहभागी होऊन, त्यातील अडथळे दूर करण्यासाठी दास्यभावात राहून रामभक्ती करणारे प.पू. दास महाराज हे एकमेव आहेत.

१ आ. श्रीरामस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी काळानुरूप समष्टी साधना होण्यासाठी प.पू. दास महाराज यांनी स्वतः प्रयत्न करणे आणि साधकांनाही त्यासाठी साहाय्य करणे : पूर्वी प.पू. दास महाराज हे पानवळ येथील त्यांच्या गौतमारण्य आश्रमात राहून गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी समष्टी साधना करत होते. आता ते गुरुदेवांना अपेक्षित आणि काळाला अनुरूप अशी समष्टी साधना होण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून समष्टी साधना करत आहेत. प.पू. दास महाराज यांना प्रभु श्रीरामस्वरूप असलेल्या गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांची सेवा हाच ध्यास आहे. ते ‘गुरुदेवांना काय आवडेल ? त्यांना काय अपेक्षित आहे ?’, याचा अंतरात ध्यास ठेवून समष्टी साधना करत आहेत. गुरुमाऊलीला अपेक्षित असे करण्यासाठी त्यांची अविरत धडपड असते आणि सर्व साधकांनाही ते गुरुमाऊलीला अपेक्षित असेच करण्यासाठी सांगतात. त्यासाठी ते साधकांना सदैव आणि सर्वतोपरी साहाय्य करत असतात.

२. गौतमारण्य आश्रमातील श्रीरामपंचायतन मंदिरातील सर्वच मूर्तींमध्ये पुष्कळ चैतन्य जाणवणे

पूर्वी हे श्रीरामपंचायतन मंदिर अतिशय लहान होते. गुरुमाऊलीच्या संकल्पाने मंदिराचा जीर्णाेद्धार होऊन आताच्या मंदिराची नूतन वास्तू उभी आहे. प.पू. दास महाराज यांनी दास्यभावात राहून प्रभु श्रीरामाची पूजा-अर्चा, आरती आणि नामस्मरण अखंडपणे केले असल्याने या रामपंचायतन मंदिरातील सर्वच मूर्तींमध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य आले आहे.

३. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी मंदिराची स्वच्छता, पूजा-अर्चा आणि आरती हे सर्व व्यवस्थित होण्यासाठी बांदा येथील गौतमारण्य आश्रमात निवासाला रहाणे

सध्या प.पू. दास महाराज हे रामनाथी आश्रमात वास्तव्यास असले, तरी त्यांच्या पत्नी पू. माई (प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) या बांदा येथील गौतमारण्य आश्रमात निवासाला आहेत. त्या श्रीरामाच्या सेवेत लक्ष घालून प्रतिदिन मंदिराची स्वच्छता, पूजा-अर्चा, आरती हे सर्व व्यवस्थित होण्यासाठी आणि ‘श्रीरामरायाच्या सेवेत खंड पडू नये’, यासाठी भक्तांकडून सर्व सेवा नीट करवून घेतात. प्रसंगी त्या स्वतःही सेवा करतात.

४. प्रतिवर्षी गौतमारण्य आश्रमात साजरा होणारा रामजन्मोत्सव !

४ अ. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या माध्यमातून बांदा परिसरात रामभक्त निर्माण होणे आणि त्यांनी प्रतिवर्षी श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करणे : ‘मुखात अखंड रामनाम आणि तनाने रामाची अखंड सेवा’ असे हे संत-दांपत्य आहे. आजच्या कलियुगात या संत दांपत्याच्या माध्यमातून बांदा परिसरात अनेक जण रामभक्त झाले आहेत. त्यांनी अनेकांना रामनामाची गोडी लावली आहे. ते सर्व जण श्रीरामनवमीच्या उत्सवाची अतिशय आतुरतेने वाट पहातात आणि मोठ्या उत्साहाने अन् यथाशक्ती उत्सवामध्ये सहभागी होऊन रामरायाची कृपा संपादन करण्यासाठी धडपडतात. या रामभक्तांकडून या उत्सवाचे नियोजन श्रीरामनवमीच्या बरेच दिवस आधीपासून चालू होते. सर्व जण प.पू. दास महाराज आणि पू. माई यांना विचारून सर्व सेवांचे नियोजन करतात आणि कार्यक्रमात मनापासून सहभागी होतात.

४ आ. श्रीरामनवमीच्या उत्सवाच्या वेळी गौतमारण्य परिसर राममय होऊन जाणे : रामजन्मोत्सव साजरा करण्यासाठी श्रीरामस्वरूप असलेल्या गुरुमाऊलीचे स्मरण करून प.पू. दास महाराज, सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम आणि सनातनचे साधक हे रामजन्मोत्सवाचे नियोजन करतात. प्रत्यक्ष श्रीरामनवमीच्या दिवशी सर्व संत, साधक आणि रामभक्त यांच्या भक्तीने अन् त्या कालावधीत पृथ्वीतलावर कार्यरत असलेल्या रामतत्त्वाने तेथील सर्व वातावरण राममय झालेले असते.

४ इ. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्वांना रामभेटीचा आनंद मिळणे आणि रामचरणांशी एकरूप होण्यासाठी सर्वांनी मनापासून साधनेचे प्रयत्न करणे : प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी तिथे उपस्थित सर्व रामभक्तांना प्रभु श्रीरामाची सूक्ष्मातून भेट झाल्याचा आनंद मिळून त्यांची भावजागृती होते. मागील २ वर्षांच्या काळात कोरोना महामारीमुळे हा उत्सव झाला नाही. तेव्हा सर्वांनी सूक्ष्मातून हा उत्सव साजरा केला. या वर्षी प्रभु श्रीरामाची कृपा झाल्यामुळे हा उत्सव होणार आहे. हे आम्हा रामभक्तांचे अहोभाग्य आहे. सर्व जण श्रीरामाच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी, म्हणजे श्रीरामस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी मनापासून साधनेचे प्रयत्न करत आहेत.

४ ई. सर्व भक्तांना रामनामात मंत्रमुग्ध करणारे कार्यक्रम ! : श्री रामनवमीच्या दिवशी रामरायाचे भजन असते. त्यात सर्व जण मंत्रमुग्ध होऊन जातात. रामरक्षेच्या पठणाने सर्वांना श्रीरामाचे चैतन्य मिळून सर्वांभोवती संरक्षककवच निर्माण होते आणि शेवटी होणाऱ्या गीतरामायणाच्या कार्यक्रमाने सर्व जण त्रेतायुगात झालेल्या रामायणाच्या प्रसंगांशी एकरूप होऊन भावविभोर होतात. किती ही गुरुमाऊलीची कृपा ! आम्हा पामरांचे भाग्य थोर, असा रामजन्मोत्सव या कलियुगात आम्हाला अनुभवता येतो.

५. कृतज्ञता

‘हे श्रीरामस्वरूप गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), आम्हाला तिथे तुमचे अस्तित्व अनुभवता येते’, यासाठी आम्ही सर्व जीव तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.’

– श्रीमती वंदना करचे (श्रीकृष्णाचा पेंद्या), पुणे (१.४.२०२२)

हृदयी स्मरावा सदैव आत्माराम ।

मुखी असू दे सदैव रामनाम ।
हृदयी स्मरावा सदैव आत्माराम ।
गुरुमाऊली द्यावे हेची वरदान ।। धृ. ।।

सदैव ध्यास उरी ।
तव चरणांशी एकरूप होण्याची ।
प्रयत्न होऊ दे आता ।
व्यष्टी अन् समष्टी साधना करण्याचे ।। १ ।।

दयाघना, नको आता अन्य काही ।
दिसावे तुझेच चरण आता ठायी ठायी ।
गळून पडू दे सर्व पाश आता ।
धाव घे झडकरी, हे गुरुनाथा ।। २ ।।

तू आम्हा सर्व लेकरांची आई ।
तुजवीण सर्व व्यर्थ हे गुरुमाऊली ।
करी कृपा आम्हा सर्व लेकरांवरती ।
घे सर्व लेकरांना आता तुझ्या चरणांशी ।। ३ ।।

– श्रीमती वंदना करचे (श्रीकृष्णाचा पेंद्या), पुणे (२९.३.२०२२)