पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील २ ‘मेट्रो’ मार्गांचे उद्घाटन !

मुंबई – कुणाला रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये, असा विकास हवा. सद्य:स्थितीत पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता आम्ही विकास करत आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो २ ए’ या मार्गांचे २ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

‘मेट्रो २’ हा ‘डी.एन्.’ नगर ते दहिसर (पश्चिम) असा एकूण १८.५ किलोमीटर लांब आहे. हा मार्ग पश्चिम उपनगरातील लिंक रोडला समांतर आहे. यावर एकूण १७ स्थानके आहेत. ‘मेट्रो ७’ हा अंधेरी ते दहिसर (पूर्व) असा पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाणारा १६.६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर एकूण १३ स्थानके आहेत. हे दोन्ही मार्ग दहिसर येथे एकमेकांना जोडलेले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या मार्गाचे काम करण्यात आले. या दोन्ही मार्गांवर न्यूनतम  १० रुपये असा तिकिटदर निश्चित करण्यात आला आहे.