गुढीपाडव्‍यापासून भक्तांना श्री विठ्ठलाचे पदस्‍पर्श दर्शन घेता येणार !

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍यासमवेत झालेल्‍या बैठकीत निर्णय

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर), ३१ मार्च (वार्ता.) – २९ मार्च या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्‍यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह सदस्‍यांची उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍यासमवेत झालेल्‍या बैठकीत गुढीपाडव्‍याच्‍या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पदस्‍पर्श दर्शन चालू करण्‍यास अनुमती देण्‍यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पदस्‍पर्श दर्शन बंद ठेवण्‍यात आले होते; मात्र आता कोरोनाचा संसर्ग न्‍यून झाल्‍याने वारकरी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्‍या पदाधिकार्‍यांनी पदस्‍पर्श दर्शन चालू करण्‍याची मागणी केली होती. त्‍यानंतर मंदिर समितीने पदस्‍पर्श दर्शन चालू करण्‍याचा ठराव करून राज्‍य सरकारकडे पाठवला होता.