१. ध्यानावस्थेत ऐकू येत असलेले नाद
७.७.२०२० या दिवशी संध्याकाळी साधकांसाठी नामजप करतांना मला आपोआप ‘ॐकारा’चा नाद ऐकू येऊ लागला.
ध्यानावस्थेत टप्प्यांनुसार नाद ऐकू येतात. ध्यान आज्ञाचक्रापर्यंत गेल्यास नगार्यावर काठी मारल्यावर जसा नाद ऐकू येतो, त्याप्रमाणे नाद ऐकू येतो. ध्यान विशुद्धचक्रापर्यंत गेल्यास घंटानाद ऐकू येतो. ध्यान सहस्रारापर्यंत गेल्यास शंखनाद, झांज आणि आरती यांचा नाद ऐकू येतो अन् थोड्या वेळाने आराध्य देवतेचे चित्र डोळ्यांपुढे उभे रहाते.
सध्या मला ‘ॐकारा’ चा नाद ऐकू येतो.’ हा नाद मणिपूरचक्राशी संबंधित आहे.
२. ध्यानावस्थेत असतांना श्वास लागण्याचा त्रास न होणे
मी साधकांसाठी नामजप करतांना ध्यानावस्थेत असतांना मला श्वास लागण्याचा त्रास होत नाही. ती ध्यानाचीच प्रक्रिया असते. मी हनुमान मुद्रा करतांना नाभीचक्रावर दाब देतो, त्या वेळी अशी स्थिती असते. त्या वेळी मला श्वास लागत नसतो, तर मी चक्रांवर लक्ष केंद्रित करून श्वास वरच्या दिशेने घेत असतो.
शारीरिक त्रासामुळे काही वेळा माझा पाय दुखतो किंवा पायात गोळा येतो. त्या वेळी मी स्वतःच ध्यानातून बाहेर येऊन समोर बसलेल्या साधकांना तसे सांगतो.
३. ध्यानावस्थेत असतांना आपत्काळाविषयी दिसलेले दृश्य !
मला ध्यानावस्थेत पुढे येणारा आपत्काळ दिसतो. ‘त्याचा परिहार होईल का ?’, असा विचार माझ्या मनात येतो. त्यावर ‘साधना करणारा जीव तरून जाईल. ज्या समाजाची विनाशाकडे वाटचाल होत आहे, त्या लोकांचे रक्षण होणार नाही’, असे माझ्या कानात ऐकू येते. मला अन्य संकेत प्राप्त झाले नाहीत.’
४. साधकांसाठी नामजप करतांना समाधी अवस्थेत असतांना स्वतःभोवती ईश्वरी कवच असल्याने ध्यानात कसलेही अडथळे न येणे
मी साधकांसाठी नामजप करतांना साधकांना आध्यात्मिक त्रास होऊ लागल्यास मला ध्यानात काही अडथळे येत नाहीत. मला कसलीच जाणीव नसते. मी समाधी अवस्थेत असतांना बाह्य परिस्थितीचा मनावर काही परिणाम होत नाही. मी समाधी अवस्थेत असतांना माझ्याभोवती ईश्वरी कवच असल्याने माझ्या ध्यानात कसलेही अडथळे येत नाहीत.
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |