रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प.पू. दास महाराज यांच्या खोलीत भावपूर्ण वातावरणात साजरी झालेली दासनवमी आणि त्या दिवशी प.पू. दास महाराज अन् खोलीतील साधक यांना मारुतिरायाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

प.पू. दास महाराज

१. दासनवमीनिमित्त प.पू. दास महाराज यांनी दासबोधाचे ९ दिवस पारायण करून देवतांना पाच फळांचा नैवेद्य दाखवणे आणि प्रार्थना करणे

‘या वर्षी दासनवमीनिमित्त प.पू. दास महाराज यांनी ९ दिवस दासबोधाचे पारायण केले. शेवटच्या दिवशी, म्हणजे दासनवमीच्या दिवशी (२५.२.२०२२ या दिवशी) प.पू. दास महाराज यांनी दासबोधाचे पारायण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी प्रभु श्रीराम, मारुतिराया आणि समर्थ रामदासस्वामी यांची चित्रे अन् दासबोध ग्रंथ यांची मनोभावे पंचोपचार पूजा आणि आरती करून पाच फळांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्यांनी प्रभु श्रीराम, मारुति, समर्थ रामदासस्वामी आणि भगवान श्रीधरस्वामी यांच्या चरणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि साधकांच्या रक्षणासाठी भावपूर्ण प्रार्थना केली.

प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील मारुतिरायांचे चित्र

२. देवतांना दाखवलेला नैवेद्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देण्याविषयीचा विचार प.पू. दास महाराज यांच्या मनात येणे

२ अ. प.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकाला नैवेद्य घेऊन जाण्यासाठी बोलवायला सांगणे : प.पू. दास महाराज यांच्या मनात ‘देवतांना दाखवलेला नैवेद्य परात्पर गुरु डॉक्टरांना देऊया’, असा विचार आला. त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकाला नैवेद्य घेऊन जाण्यासाठी बोलवायला सांगितले. त्या वेळी तो साधक अन्य सेवेत व्यस्त असल्याने त्याचा संपर्क होऊ शकला नाही. प.पू. दास महाराज यांना त्याविषयी सांगितल्यानंतर ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. थोड्या वेळाने त्याला पुन्हा संपर्क करून बोलावू.’’

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. दास महाराज यांच्यासाठी शहाळ्याचे पाणी देणे : त्यानंतर १० ते १५ मिनिटांनी एक साधिका अकस्मात् प.पू. दास महाराज यांच्या खोलीत आली. तिने प.पू. दास महाराज यांना सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आज तुमच्यासाठी शहाळ्याचे पाणी दिले आहे.’’ ते ऐकून प.पू. दास महाराज यांची भावजागृती झाली. हे पाहून आम्हा सर्वांना आनंद झाला. प.पू. दास महाराज यांनी प.पू. गुरुदेवांनी दिलेले शहाळ्याच्या पाण्याचे भांडे हातात घेतल्यावर त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने भावाश्रू वाहू लागले.

२ इ. प.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेले शहाळ्याचे पाणी ‘तीर्थ’ या भावाने पिणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाच फळे असलेले नैवेद्याचे ताट देणे : प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी नैवेद्याचे ताट अर्पण करण्याचा विचार आला आणि ती कृती पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्थुलातून या दासासाठी तीर्थ (शहाळ्याचे पाणी) पाठवून दिले. मी अंतर्यामी सद्गुरूंच्या चरणी अनन्यभावे कोटीशः कृतज्ञ आहे.’’ प.पू. दास महाराज यांनी तीर्थ घेतले आणि देवापुढे ठेवलेले पाच फळांचे नैवेद्याचे ताट साधिकेला देत ते म्हणाले, ‘‘हे ताट गुरुदेवांना देऊन माझा त्यांना शिरसाष्टांग नमस्कार सांग.’’

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाच फळांचा आनंदाने स्वीकार करून प.पू. दास महाराज यांना ‘साधकांना प्रसाद म्हणून द्यावा’, असा निरोप पाठवणे : नैवद्याचे ताट मिळाल्यावर गुरुदेवांनी नैवेद्याचा आनंदाने स्वीकार केला. त्यांनी ते ताट प.पू. दास महाराज यांना प्रसाद म्हणून पाठवून दिले आणि निरोप दिला, ‘‘तुम्हाला ज्या साधकांना द्यावेसे वाटते, त्यांना प्रसाद म्हणून द्यावा.’’ नंतर प.पू. दास महाराज यांनी तो प्रसाद दिवसभरात आश्रमातील अनेक संत आणि साधक यांना खोलीत बोलावून दिला.

३. प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील चैतन्यात वाढ होणे, त्यांनी ‘श्रीराम, मारुतिराया, समर्थ रामदासस्वामी आणि ग्रंथराज दासबोध’ यांच्याविषयी कौतुकाने सांगणे

त्या दिवशी प.पू. दास महाराज यांच्या खोलीतील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली होती. ‘आम्ही एका लहान खोलीत आहोत’, असे वाटत नव्हते. प.पू. दास महाराज खोलीत येणारे संत आणि साधक यांना ‘श्रीराम, मारुतिराया, समर्थ रामदासस्वामी आणि ग्रंथराज दासबोध’ यांच्याविषयी कौतुकाने सांगत होते.

४. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी श्रीरामाचे भजन म्हटल्यावर प.पू. दास महाराज आणि साधक यांची भावजागृती होणे

त्याच रात्री ९ वाजता प.पू. दास महाराज यांनी आश्रमात संगीताविषयी संशोधनाचे प्रयोग करण्यासाठी आलेले ठाणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांना प्रसाद घेण्यासाठी बोलावले. त्या वेळी प.पू. दास महाराज यांनी त्यांना श्रीरामाविषयी एक भजन म्हणायला सांगितले. काकांच्या वाणीतील चैतन्यामुळे त्यांचे भजन ऐकतांना प.पू. दास महाराज आणि खोलीतील उपस्थित साधक यांची भावजागृती झाली. खोलीतील वातावरणातही पालट झाला.

परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. दास महाराज यांच्या कृपेने आम्हाला दासनवमीच्या दिवशी (२५.२.२०२२ या दिवशी) रात्री साडेदहा वाजता मारुतिरायांची कृपा अनुभवता आली. त्याबद्दल आम्ही मारुतिराया, परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. दास महाराज यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. माधवी पोतदार, कु. सोनाली खटावकर, श्री. आशुतोष गायकवाड आणि श्री. श्रेयस मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२२)

चित्रामध्ये मारुतिरायाचा डावा डोळा उघडलेला दिसत आहे.

रात्री खोलीत बसून नामजप केल्यावर प.पू. दास महाराज यांना ‘मारुतिराया प्रत्यक्ष समोर बसले आहेत’, असे जाणवणे आणि खोलीत उपस्थित साधकांना ‘मारुतिराया डावा डोळा उघडून त्यांच्याकडे पहात आहे’, असे दिसणे

दासनवमीच्या दिवशी प.पू. दास महाराज आणि आम्ही सर्व साधक खोलीत बसून नामजप करत होतो. नामजप झाल्यानंतर कु. माधवी पोतदार यांचे खोलीतील मारुतिरायाच्या चित्राकडे लक्ष गेले. तेव्हा ‘मारुतिराया डावा डोळा उघडून त्यांच्याकडे पहात आहे’, असे त्यांना दिसले. त्याच वेळी खोलीत नामजपाला बसलेले पाच साधक आणि प.पू. दास महाराज यांनाही तसे जाणवले. प.पू. दास महाराज यांना ‘मारुतिराया प्रत्यक्ष समोर बसले आहेत’, असे जाणवले. तेव्हा त्यांच्या देहावर रोमांच आले.

– कु. माधवी पोतदार, कु. सोनाली खटावकर, श्री. आशुतोष गायकवाड आणि श्री. श्रेयस मुळे (५.३.२०२२)