१. ध्यान लागल्यावर जिवाला प्राप्त होत असलेली विदेही स्थिती
१ अ. ध्यान लागल्यावर जीव स्वतःला विसरत असणे आणि त्याची विदेही स्थिती होऊन भावसमाधी लागणे : ‘जीव समाधी अवस्थेत असतांना त्याला आनंदाश्रू येऊन तो रडू लागतो. नंतर तो विष्णुरूप पाहून हसू लागतो. त्या विष्णूचे रूप पाहून त्या रूपातूनच जिवाचे ध्यान लागू लागते. ध्यान लागल्यावर जीव स्वतःला विसरतो. त्याला विदेही स्थिती येते आणि तो देवाशी एकरूप होऊ लागतो. त्याची भावसमाधी लागते.
१ आ. मनुष्य समाधीस्थितीत गेल्यावर त्याला जीवनाची वा कसलीच आसक्ती न रहाणे : भावावस्थेनंतर भावजागृती होऊन रडणे, हसणे किंवा नामजप चालू होणे, अशा अनेक अवस्था येतात. काही जण वैखरीतून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’असा नामजप करू लागतात, तसेच काही जण समाधीतून उठून नाचायला लागतात; पण ती समाधी अवस्था असते. मनुष्य एकदा समाधी अवस्थेत गेला की, त्याला जीवनाची वा कसलीच आसक्ती रहात नाही. त्याची खाण्या-पिण्याची आसक्ती अल्प होत जाते. त्यासाठी काही तपे (१२ वर्षांचे १ तप) जावी लागतात. भावसमाधी, भावमुद्रा समाधी, निर्विकल्प समाधी, म्हणजे ‘देह आहे कि नाही कुणास ठाऊक ?’, असे होते. मग पाण्यातही समाधी लागते आणि देह तरंगतो.
२. चरितार्थ चालवण्यासाठी कामधंदा चालू करावा लागल्याने ध्यानसाधनेला वेळ अल्प मिळणे
चिन्मयानंद स्वामींकडे माझे ‘हसणे, ‘ॐ’काराचा जप करणे, नाचणे, श्रीरामाचे दर्शन घडणे’, असे व्हायचे. मध्यंतरी काही कालावधीसाठी हे बंद झाले होते; कारण चरितार्थ चालवण्यासाठी मला कामधंदा करावा लागला. त्यामुळे मला ध्यानसाधनेला वेळ अल्प मिळू लागला.
३. साधकांसाठी नामजप करतांना आश्रमातील चैतन्यामुळे ध्यान चांगले लागून विदेही स्थिती प्राप्त होणे
रामनाथी आश्रमात आल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी साधकांसाठी नामजप करत आहे. तेव्हापासून माझी ध्यानसाधना चालू झाली. गुरूंची आज्ञा आणि संकल्प अन् आश्रमातील चैतन्य यांमुळे माझे ध्यान चांगले लागते. त्यामुळे आता मला विदेही स्थिती प्राप्त होत आहे.’
– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |