रशिया आणि युक्रेन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची तुर्कस्तानमध्ये बैठक !

युद्ध चालू झाल्यानंतर प्रथमच उच्चस्तरीय बैठकीत उभय देशांमध्ये चर्चा !

अंटाल्या (तुर्कस्तान) – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर १० मार्च या दिवशी प्रथमच उभय देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. तुर्कस्तानच्या अंटाल्या येथे दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री भेटले असून ही बैठक दोन्ही देशांतील संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, अशी तुर्कस्तानला आशा आहे.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जे लावरोव यांच्याशी भेट झाल्यानंतर ‘दोन्ही देशांचे शस्त्रसंधीवर एकमत होईल’, अशी युक्रेनला अपेक्षा आहे. तरीही या बैठकीची विशेष फलनिष्पत्ती मिळणार नाही. आम्हाला शस्त्रसंधी, आमच्या प्रांतांना स्वतंत्र करणे आणि सर्व मानवसंकटांवर उपाय काढणे, यांमध्ये रस असल्याचे कुलेबा म्हणाले. दुसरीकडे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, युक्रेनने तटस्थ भूमिका घेत ‘नाटो’मध्ये सहभागी न होण्याचे घोषित केल्यासच आम्ही आमची कारवाई थांबवू, असे वृत्त ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिले आहे. या बैठकीच्या वेळी तुर्कस्तानचे मंत्री मेवलुत कावुसोगलूही उपस्थित होते.

‘ब्लॅक सी’मध्ये तुर्कस्तानच्या सागरी सीमा या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी जोडलेल्या असून त्याचे दोन्ही देशांशी सलोख्याचे संबंध आहेत. तुर्कस्तानने रशियाच्या युक्रेनवरील सैनिकी कारवाया अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले असले, तरी त्याच्यावर घालण्यात आलेल्या निर्बंधांना विरोधही केला आहे.