युक्रेन ‘नाटो’च्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार !  

अखेर रशियाची मागणी झेलेंस्की यांना मान्य

युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – आपण यापुढे ‘नाटो’ (नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) संघटनेच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडून देऊ, असे आश्‍वासन युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दिली. युक्रेनने ‘नाटो’ सदस्यत्वासाठी धरलेला आग्रह हे रशियाने आक्रमण करण्यामागचे मुख्य कारण होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला १४ दिवस झाले आहेत. या दोघांमध्ये चर्चेच्या ३ फेर्‍या झाल्या आहेत. तिसर्‍या फेरीमध्ये रशियाने काही अटी ठेवल्या होत्या. ‘त्या पूर्ण केल्या, तरच युद्ध थांबवू’, असे रशियाने म्हटले होते. त्यामध्ये एक अट ‘युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होऊ नये’, ही होती.

युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील दोन राज्ये डॉनेत्स्क आणि लुहान्स्क यांना ‘स्वतंत्र राष्ट्रे’ म्हणून घोषित केले होते. या राष्ट्रांना युक्रेनने मान्यता देण्याची अट होती. या अटीवरही तडजोड करण्यास सिद्ध असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

रशियाला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – झेलेंस्की यांची मागणी

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ८ मार्चच्या रात्री ब्रिटन संसदेला संबोधित करतांना युक्रेनला साहाय्य करण्याचे आवाहन केले. या वेळी झेलेंस्की यांनी ‘रशियाला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी ब्रिटिश संसदेसमोर केली. यासह ‘ब्रिटनचा आकाशमार्ग सुरक्षित रहाण्यासाठी रशियावर कडक निर्बंध लागू करावेत’, अशीही मागणी त्यांनी केली.

झेलेंस्की म्हणाले की, आम्ही शत्रूसमोर गुडघे टेकणार नाही आणि आम्ही पराभूतही होणार नाही. आम्ही आमच्या देशासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत राहू.