भारतीय विद्यार्थ्यांना आता मॉस्को मार्गे भारतात आणणार !

नवी देहली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय वायूदलाचे विशेष विमान आता मॉस्को मार्गे भारतात परत आणणार आहे. मॉस्को ते खारकीव हे अंतर ७५० किलोमीटर इतके आहे. रशियाचे सैन्य युद्धग्रस्त शहरांमधून भारतीय विद्यार्थ्यांना मॉस्कोतील वायूदलाच्या तळापर्यंत सुरक्षितपणे नेण्यासाठी ‘ह्युमॅनिटेरियन कॉरिडॉर’ (मानवतेच्या दृष्टीकोनातून उपलब्ध करून दिलेला रस्ता) बनवतील. तेथून हे विद्यार्थी या विशेष विमानांमध्ये बसून गाझियाबादच्या हिंडन तळावर परत येतील.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युक्रेनच्या सुमी आणि खारकीव या पूर्वेकडील शहरांमध्ये सध्या भीषण युद्ध चालू आहे. या शहरांमध्ये शेकडो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. २४ फेब्रुवारीपासून युक्रेनचा आकाशमार्ग बंद असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया मार्गे बाहेर काढले जात आहे. युद्धस्थळी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, आता सुमी आणि खारकीव या शहरांमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या पश्‍चिम सीमेपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे भारतीय वायूदलाचे विमान मॉस्कोला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युद्धग्रस्त भागांतून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्यदलांचे साहाय्य घेतले जाईल. यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे.