गडचिरोली येथे नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना अटक !

नक्षलवाद नष्ट करू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक 

गडचिरोली – नक्षलवाद्यांना पुष्कळ प्रमाणात स्फोटक साहित्य पुरवठा करणार्‍या नक्षल समर्थक टोळीतील ४ जणांना येथील पोलिसांनी अटक केली आहे. राजू सल्ला, काशिनाथ उपाख्य रवि मुल्ला गावडे, साधु लच्चा तलांडी आणि महंमद कासिम शादुल्ला, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर छोटू उपाख्य सिनू मुल्ला गावडे हा पसार झाला आहे. त्याचा पोलीसदलाकडून कसून शोध घेतला जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जिमलगट्टा उपविभागांतर्गत दामरंचा भंगारामपेठा गावात पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात उपपोस्टे दामरंचा पोलीस ठाण्यातील आणि शीघ्र कृती दलातील सैनिक नक्षलविरोधी अभियान राबवत होते. या वेळी काही व्यक्ती तेलंगाणामधून दामरंचा मार्गे छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांना काही साहित्य पोचवण्यासाठी जात आहेत, अशी माहिती मिळाली. या वेळी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्यांच्याकडून ‘कार्ड एक्स वायर’चे ३ सहस्र ५०० मीटर लांबीचे बंडल आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. कार्ड एक्स वायर ही बाँब बनवण्यासाठी वापरली जाते.