सोलापूर विभागातील बससेवा हळूहळू पूर्वपदावर !

संपानंतर सोलापूर आगारातून अडीच लाख प्रवाशांनी केला एस्.टी.ने प्रवास

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – मागील ३ मासांपासून सोलापूर बसस्थानकासह राज्यभरातील बस बंद होत्या; मात्र आता सोलापूर विभागातील बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.  संपानंतर एस्.टी.च्या दीड सहस्र फेर्‍या आतापर्यंत पूर्ण झाल्या असून अडीच लाख प्रवाशांनी एस्.टी. बसने प्रवास केला असल्याची मािहती अधिकार्‍यांनी दिली आहे. लाल परी धावू लागल्याने ३ मासांनंतर बसस्थानक पुन्हा एकदा गजबजले आहे. सोलापूर विभागातील बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, आगारांतून विविध मार्गांवर एस्.टी. बस चालू झाल्या आहेत.

बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बसस्थानकातून दिवसाकाठी अधिक फेर्‍या होत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्याही चालू करण्याचा विचार असल्याचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी सांगितले. ३ मासांपूर्वी एस्.टी. बस पूर्णतः बंद असल्यामुळे बसस्थानकात खासगी वाहनाने प्रवासासाठी अनुमती देण्यात आली होती; मात्र सोलापूर आगारातून अनेक बस चालू झाल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांकडे पाठ फिरवली आहे.