वीर सावरकर : राखेतून एका प्रेषिताचा (ईश्वराच्या दूताचा) उदय ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, भारत

‘वीर सावरकर : दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…

पुस्तकाचे मुखपृष्ठ

भारताने सखोल आत्मपरीक्षण करण्याचा काळ !

एखाद्या राष्ट्राच्या इतिहासात असा एक क्षण येतो, जेव्हा त्याने स्वतःच्या भूतकाळाविषयी चिंतन केले पाहिजे. स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध ‘वाद’ ओलांडून खोल आत्मपरीक्षण केले पाहिजे. आज असा क्षण भारतासाठी आला आहे. विशेष म्हणजे इतिहासाचा ‘कॅनव्हास’ (चित्रफलक) कधी कधी पुष्कळ फसवा असतो. त्यात चिरंतन नायकांसारखे दिसणारे लोक काही दशकांनंतर किंवा त्यांच्या निधनानंतर फिकट गुलाबी आकृत्यांमध्ये पालटतात. याउलट इतिहास जसजसा उलगडत जातो, तसतसे त्यांच्या हयातीत दुर्लक्षित, उपेक्षित म्हणून हिणवले गेलेले काही जण नायक म्हणून उदयास येतात आणि त्यांचे खरे चरित्र अन् राष्ट्रासाठीचे योगदान जगासमोर येते. यातील पहिल्या वर्गात जवाहरलाल नेहरू येतात, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यानंतर संस्थात्मक उभारणीचे विलक्षण कार्य केले; मात्र आज भारताचे नायक म्हणून त्यांची ओळख नेहरूप्रेमी असणार्‍या एका छोट्या गटापुरती उरली आहे. याचे मुख्य कारण आहे, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण या आघाड्यांवर केलेल्या अनेक चुका ! ज्या चुकांसाठी भारताने मोठी किंमत मोजली आहे. याखेरीज त्यांच्या अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याच्या धोरणांमुळे भारताला फाळणीचा आघात स्वीकारावा लागला आहे.

‘वीर सावरकर’ हे यातील दुसर्‍या वर्गात येतात. वर्ष १९६६ मध्ये एक ‘उपेक्षित वीर’ म्हणून त्यांचे निधन झाले. तथापि आज कलम ३७० रहित करणे, पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करणे, तसेच विघटनकारी शक्तींच्या विरोधात मजबूत सुरक्षासंरचना सिद्ध करून जागतिक स्तरावर स्वतःचे अस्तित्व दाखवून देणे, या स्थितीत भारत आला आहे. याला फुटीरतावादी शक्तींशी कोणतीही तडजोड न करण्याची स्वातंत्र्यवीर सावरकरांची दृष्टी कारणीभूत आहे.

उदय माहुरकर

सावरकर एक विद्वत्तापूर्ण संघटक !

आडमुठ्या राष्ट्रांसमवेत ‘जशास तसे’ धोरण, मुत्सद्दीपणा आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्यावर निर्विवाद विश्वास, हे सावरकरांचे दूरगामी धोरण होते. भारताची सुरक्षा, तसेच मुत्सद्देगिरी यांच्या संदर्भात सावरकरांची दूरदृष्टी अतुलनीय आहे. भारताला गेल्या ७४ वर्षांत भेडसावलेल्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्यांचे भाकीत त्यांनी अनुमाने ८० वर्षांपूर्वीच वर्तवले होते. त्यांचा निस्सीम राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व हे धर्मनिरपेक्षतावाद्यांप्रमाणे भेदभाव करणारे नव्हते. सावरकर एक विद्वत्तापूर्ण संघटक, नव्हे तर ‘एक प्रेषित’ (अर्थ : ईश्वराचा दूत) म्हणून उठून दिसतात; मात्र त्यांची समर्थ भारताची संकल्पना मान्य नसणार्‍यांनी, तसेच तत्कालीन विभाजनवादी शक्तींशी हातमिळवणी केलेल्यांनी केवळ स्वतःच्या राजकीय, तसेच वैचारिक मतभेदापोटी सावरकरांना अस्पृश्य ठरवून त्यांची सदैव निंदाच केली.

या कारणांमुळे सावरकरांची भारताची कल्पना काय होती, ते मी आणि माझे सहलेखक चिरायू पंडित यांनी या पुस्तकाद्वारे देशासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून असा भारत अपेक्षित आहे की, ज्याला बलशाली, लढाऊ, मुत्सद्दी आणि कुशल म्हणून जागतिक स्तरावर मान्यता असेल, तसेच ‘राष्ट्र प्रथम’ हेच प्रमुख तत्त्व असेल आणि कोणत्याही प्रकारच्या धार्मिक तुष्टीकरणाला स्थान नसेल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे द्रष्टेपण !

फार थोड्या लोकांना ठाऊक आहे की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानला पळून जाण्यात आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्यासाठी इंग्रजांच्या विरोधी शक्तींचे साहाय्य घेण्यात सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामागे सावरकरांचा विचार होता की, जागतिक स्तरावर कोणतीही दोन राष्ट्रे कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात. पाकिस्तानची भविष्यातील भारतविरोधी भूमिका आणि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणावर आधारित हिंदू-मुसलमान समस्या यांचे भाकीत करण्याव्यतिरिक्त सावरकरांनी वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाचे भाकीत वर्ष १९५४ मध्ये, म्हणजे आठ वर्षे अगोदरच केले होते. चीनसमवेत पंचशील आणि शांतता यांविषयीची सावरकरांची प्रतिक्रिया भविष्य सूचक होती. ते म्हणाले होते, ‘‘चीनला तुमच्या पंचशिलांची पर्वा नाही; कारण तुमचे पंचशील जपमाळेतील मण्यांचे आहे, तर त्यांच्या पंचशिलात रणगाडे, पाणबुड्या, तोफा, बाँब आणि अणूबाँब आहेत. आज (आपले) राष्ट्र केवळ लेखणीने चालवले जाते. ते तलवारीने चालवले पाहिजे. देश बांधवांनो, माझा तुम्हाला संदेश आहे की, सैन्याचे आधुनिकीकरण करा. जर इतर राष्ट्रांनी हायड्रोजन बाँबचा शोध लावला, तर तुम्ही ऑक्सिजन बाँबचा शोध लावा, तरच तुम्ही भारताला एक मजबूत राष्ट्र बनवू शकता आणि स्वाभिमानाने जगू शकता. वर्ष १९४८ मध्ये भारत लष्करीदृष्ट्या चीनच्या तुलनेत बलाढ्य होता; पण नेहरूंच्या धोरणांमुळे चीनने लष्करी सामर्थ्यात भारताला झपाट्याने मागे टाकले. येथेही सावरकर किती भविष्यसूचक होते !

चिरायू पंडित

फाळणी टाळता आली असती का? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न

सावरकरांना त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीसाठी पुष्कळ अपमानित केले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, डावी विचारसरणी असलेले आणि इस्लामी वर्चस्ववादी या त्रिकूट नेत्यांनी सावरकरांना मुसलमानविरोधी विचारसरणीचे समर्थक ठरवले आहे; मात्र वस्तूस्थिती नेमकी उलटी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या स्वतंत्र भारताच्या हिंदु घोषणापत्रात सर्व जाती आणि धर्म यांना समान हक्क देण्याचे वचन दिले आहे. इतकेच नव्हे, तर एक पाऊल पुढे जाऊन ‘अल्पसंख्यांकांना त्यांच्या प्रार्थनांत अडथळा येत असल्यास प्रसंगी संरक्षण देऊ’, असेही सांगितले आहे; परंतु ‘धार्मिक अल्पसंख्यांकवादा’च्या नावाने भारतात आणखी एक देश निर्माण करण्याचा प्रयत्न चालणार नाही’, अशी कडक चेतावणीही दिली होती. दुर्दैवाने गेल्या ७० वर्षांत भारतात हेच प्रयत्न चालू आहेत. विशेष म्हणजे सावरकरांनी वर्ष १९३७ मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केल्याच्या दिवसापासूनच काँग्रेसच्या मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या परिणामांविषयी चेतावणी दिली होती. ही भारताची फाळणी होण्याच्या १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे या पुस्तकाद्वारे पाकिस्तानची निर्मिती रोखण्यासाठी सावरकरांनी केलेल्या सर्व कृतींचा मागोवा घेऊन काँग्रेसने सावरकरांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले असते, तर फाळणी टाळता आली असती का ? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

सावरकरयुगाचा प्रारंभ होत आहे !

सावरकर विचारांचे अभ्यासक दिवंगत ज.द. जोगळेकर यांनी त्यांच्या लेखणीतून सावरकरांचे विचार आणि व्यक्तीमत्त्व यांचा प्रसार करण्याचे स्तुत्य कार्य केले आहे. सावरकरांच्या मृत्यूवर भाष्य करतांना त्यांनी त्यांच्या एका उत्कृष्ट लेखनाचा शेवट अत्यंत दुःखाने केला आहे. त्यात ते म्हणाले आहेत, ‘‘एक उत्कृष्ट नायक अनंतात विलीन झाला. एका युगाचा अंत झाला. एक प्रेषित दुर्लक्षित म्हणून मरण पावला.’’ जोगळेकरांना या वेदनांमध्ये एका वैश्विक सोनेरी तत्त्वाचा विसर पडला होता की, निसर्गाच्या नियमानुसार, अंतिमतः सत्यच विजयी होते. कदाचित् त्यास वेळ लागला म्हणून काय झाले ? बुद्धाच्या निर्वाणानंतर २०० वर्षांहून अधिक काळ भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्म दुर्लक्षित होता. जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध तत्त्वांचा स्वीकार करून सर्वदूर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यास प्रारंभ केला, तेव्हाच तो इतरांना कळला. त्या काळी कुणीही विचार केला नसेल की, २००० वर्षांनंतर बौद्ध धर्म हा जगातील चौथा सर्वांत मोठा धर्म असेल. बुद्धाप्रमाणेच सावरकरांचे विचार अनेक दशके दुर्लक्षित राहिले; मात्र आज सावरकरयुगाचा प्रारंभ होत आहे.


ग्रंथप्रकाशन सोहळा

श्री. उदय माहुरकर आणि श्री. चिरायु पंडित लिखित

वीर सावरकर : ‘दी मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन

मुख्य अतिथी

श्री. प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक (निवृत्त), महाराष्ट्र, तसेच अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.

प्रमुख वक्ते

१. प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, तपोभूमी कुंडई, गोवा

२. श्री. उदय माहुरकर, माहिती आयुक्त, भारत शासन

३. श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्थळ : गोवा विद्यापीठ, ‘केमिकल सायन्स’चे सभागृह, ताळगाव, गोवा.

संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८

दिनांक : रविवार, ९ जानेवारी वेळ : दुपारी ४.३० वाजता

कार्यक्रमाची ऑनलाईन मार्गिका (लिंक) !

Youtube.com/HinduJagruti
twitter.com/HinduJagrutiOrg
www.HinduJagruti.org

आयोजक : हिंदु जनजागृती समिती