हिंदु राष्ट्र प्रभावीपणे सांभाळण्यासाठी पालकांनी दैवी बालकांना सक्षम करणे आवश्यक !

सौ. अनुभूती टवलारे

१. पालकांनी स्वतः धर्माचरण करून त्यांच्या पाल्यांकडून धर्माचरणाच्या कृृती करवून घेणे आवश्यक आहे !

‘सध्या समाजातील सर्व बालके बुद्धीने अतिशय प्रगल्भ असल्याचे लक्षात येते. ईश्वरीकृपेने त्यांच्यात मुळातच धर्माविषयी अभिमान असल्याची उदाहरणेही आपल्याला पहायला मिळतात; परंतु ज्याप्रमाणे मातीचे भांडे बनवण्यासाठी त्याला आकार द्यावा लागतो, एखाद्या रोपाला मोठे करून त्याला फळे येण्यासाठी, त्याला योग्य खत-पाणी घालावे लागते, तसेच या बाल्यावस्थेतील जिवांना हिंदु राष्ट्र सांभाळण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनाच आपल्या पाल्यांना योग्य वळण लावावे लागणार आहे. बालकांमध्ये असलेला धर्माभिमान जागृत ठेवून त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे, हे त्यांच्या पालकांचेच दायित्व आहे. यासाठी पालकांनी स्वतः धर्माचरण करून पाल्यांकडून धर्माचरणाच्या कृती करवून घेणे आवश्यक आहे.

२. इंग्रजांनी त्यांच्या संस्कृतीचा भारतियांच्या मनावर निर्माण केलेला पगडा काढून टाकणे आवश्यक

इंग्रज भारत देश सोडून गेले; परंतु ते भारतियांच्या मनावर त्यांच्या संस्कृतीचा पगडा निर्माण करून गेले. वाढदिवसाचे उदाहरण बघितले, तर आज ‘अधिकाधिक हिंदूंच्याच घरात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो’, असे लक्षात आले आहे. बर्‍याच वेळा धर्माचे कार्य करणारे किंवा हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी जोडलेले कुटुंब असले, तरीही आजही अशा कुटुंबांत केक कापण्याची प्रथा रूढ आहे. ‘आज आपण या बालकांसमोर वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासारख्या अयोग्य कृती केल्या, तर हिंदु राष्ट्र सांभाळणारी ही पिढी भविष्यात कशी घडेल ?’, याचा विचार आपण करायला हवा.

३. ‘बालके अनुकरणप्रिय असल्याने त्यांच्या पालकांनी अंतर्मुख होऊन प्रत्येक कृती करणे’, ही काळाची आवश्यकता !

ईश्वरी कृपेने पृथ्वीवर अनेक दैवी बालके जन्माला आली आहेत. त्यांना आपण बालवयातच अयोग्य सवयी शिकवल्या, तर ती बालके ‘धर्माचरण आणि साधना’ यांपासून आपोआप दुरावतील. ‘बालके अनुकरणप्रिय असल्याने पालकांनी अंतर्मुख होऊन प्रत्येक कृती करणे’, ही काळाची आवश्यकता आहे. पालकांनी आपल्या पाल्यांवर ‘औक्षण करून वाढदिवस साजरा करणे, कुणी अयोग्य पद्धतीने किंवा धर्माच्या विरुद्ध कृती करत असल्यास त्यांना रोखणे, सणांच्या शुभेच्छा मराठी किंवा हिंदी या भाषांतून देणे, सात्त्विक केशभूषा करणे, बालकांच्या क्षमतेनुसार त्यांच्याकडून घरातील लहान लहान कामे करवून घेणे’, आदी संस्कार करून ही ईश्वरी कृपा असलेली दैवी बालके हिंदु राष्ट्र प्रभावीपणे सांभाळण्यासाठी घडवूया.

‘बालकांना केवळ जन्म देऊन नव्हे, तर ईश्वराला अपेक्षित असे घडवून खरी ईश्वरी कृपा अनुभवूया’, अशी सर्व हिंदु पालकांना नम्र विनंती आहे.’

– सौ. अनुभूती टवलारे, अमरावती (२०.१०.२०२१)