एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या जिज्ञासूंनी वेळोवेळी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

१. एस्.एस्.आर्.एफ्.च्या ‘संकेतस्थळाच्या संपर्कात येणे’, हे उच्च शक्तीचे नियोजन !

‘एक दिवस मी अकस्मात ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाला भेट दिली अन् तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडलो. ‘देवानेच माझ्यासाठी या संकेतस्थळाचे पान उघडून दिले’, असे मला वाटते. तुमचे संकेतस्थळ खरोखरच अर्थपूर्ण आहे. तेथे मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. ‘संकेतस्थळावरील लिखाण वाचणे’, हा एक दिव्य आणि आनंददायी अनुभव आहे. हे लिखाण वाचतांना माझ्या शरिराला काही क्षण चांगली स्पंदने जाणवली. ‘संकेतस्थळाच्या संपर्कात येणे’, हा माझ्यासाठी योगायोग असू शकत नाही. ते निश्चितपणे एका उच्च शक्तीचे नियोजन असून तिनेच मला हा मार्ग दाखवला आहे.

– श्री. दीपांशु गडिया, इंदूर, भारत.

२. सलग ६ मासांपासून नामजप केल्यामुळे चांगले परिणाम दिसून येणे

‘कुलदेवतेचा नामजप आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप केल्यामुळे माझ्या जीवनात चांगले परिणाम झाले आहेत. सलग ६ मासांपासून मी हे नामजप सतत करत आहे. त्यामुळे मला केवळ मानसिकच नव्हे, तर व्यावसायिक क्षेत्रातही लाभ झाला आहे.’ – श्री. विक्रांत कुलश्रेष्ठ, ग्वाल्हेर, भारत.

३. नामजप करायला आरंभ केल्यापासून पित्तामुळे तोंडवळ्यावर येणारे चट्टे (रॅशेस) यायचे बंद होऊन त्वचा नितळ अन् मऊ होणे

‘मी नामजपाला आरंभ केल्यापासून पित्तामुळे माझ्या तोंडवळ्यावर येणारे चट्टे (रॅशेस) येणे बंद झाले आहेत. यामुळे माझी देवावरील श्रद्धा वाढली आहे. मी १२ वर्षांची असल्यापासून मला हा त्रास होत होता. आता मी २७ वर्षांची असून अलीकडेच मी नामजप करायला आरंभ केला आहे. त्यानंतर या चट्ट्यांमुळे (रॅशेसमुळे) होणार्‍या वेदना उणावल्या अन् टप्प्याटप्प्याने माझी त्वचा नितळ होत जाऊन आता ती पूर्णतः स्वच्छ अन् मऊ झाली आहे. या रोगामुळे मी काही पदार्थ खाऊ शकत नव्हते; मात्र आता मी ते खाऊ शकते. पूर्वी मी पेलाभर दूध प्यायले, तरी माझ्या त्वचेवर चट्टे यायचे; मात्र आता मी चॉकलेट, डाळी इत्यादी सर्व खाऊ शकते, तसेच दूधही पिऊ शकते. मला नवीन जीवन दिल्याविषयी एस्.एस्.आर्.एफ्.ला धन्यवाद आणि ईश्वरचरणी कृतज्ञता !’ – कु. सेहरिश

४. आफ्रिकेत साधना करणे कठीण असल्याने ‘साधकांनी आफ्रिकेत यावे’, अशी इच्छा व्यक्त करणारे श्री. मोर्ना डेव्हिड !

‘माहितीजालाद्वारे मी तुमच्या संपर्कात राहू शकतो’, याचा मला आनंद होत आहे. मी आफ्रिकेत रहात असून तेथे तुमचे केंद्र नाही. येथे साधना करणे फार कठीण असले, तरी मी प्रतिदिन साधना करत आहे. ‘एक न एक दिवस तुम्ही आफ्रिकेला, विशेषतः घानाला यावे’, यासाठी मी ईश्वराला प्रार्थना करत आहे.’ – श्री. मोर्ना डेव्हिड, घाना, आफ्रिका.

५. जर्मन फेसबूक – दोन संकेतस्थळांवरील लिखाणांतील साम्य वाचून आश्चर्यचकित होणे

‘तुमचे संकेतस्थळ फारच चांगले आहे अन् तुम्ही उत्तम काम करत आहात. मी अन्य एका संकेतस्थळावरील सुवचने नियमितपणे वाचते. ८.७.२०१८ या दिवशीच्या सुवचनातील लिखाण एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील पुढील लिखाणाशी तंतोतंत जुळते, ‘जीवनातील अनेक समस्या किंवा आजार यांचे मूळ कारण सूक्ष्म जगतात असते; किंबहुना सूक्ष्म शक्तींनी मानवावर नियंत्रण मिळवल्यामुळे किंवा त्याला पछाडल्यामुळे असे आजार होतात. मानवाची अयोग्य जीवनपद्धत किंवा तामसिक जीवनशैली यांमुळे तो स्वतःच हे आजार ओढवून घेतो.’ दोन्ही लिखाणांतील साम्य वाचून मी आश्चर्यचकित झाले, तसेच ‘धर्मप्रमुखांनी सांगितलेले अंतिम सत्य एकच आहे’, याची मला निश्चिती झाली.’ – कु. हेदी फिशर, जर्मनी

६. स्पॅनिश फेसबूक – सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली !

‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर मला अध्यात्माच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्याचा अमूल्य लाभ झाला. हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्याविषयी ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता.’ – कु. डायना परेझ, व्हेनेझुएला

७. साधनेत गुरूंच्या मार्गदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अनुभवान्ती पटणे अन् साधनेमुळे स्वतःत पालट होत असल्याची जाणीव होऊ लागणे

‘मी गुरूंचे मार्गदर्शन न घेताच वेगवेगळी साधना करत होतो. एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगांना उपस्थित राहू लागल्यावर आणि संकेतस्थळावरील लिखाण वाचल्यानंतर मला गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचे महत्त्व पटले अन् ते अनुभवायलाही आले. त्यानुसार आचरण केल्यानंतर मला हळूहळू मनाला शांती मिळत असल्याचे जाणवले. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवू लागल्याने आता त्यांची तीव्रता उणावू लागली आहे. साधना अन् सत्सेवा करण्यात मला आनंद मिळत असून मी मोक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘डिरेक्शन इज मोर इम्पॉर्टन्ट दॅन स्पीड (गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे.)’ ही पोस्ट वाचल्यानंतर ‘अध्यात्मात आणि माझ्या साधनेसाठी ‘वेग’ आणि ‘इतरांशी तुलना करणे’ हे योग्य नाही’, हे माझ्या लक्षात आले. एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता !’ – श्री. श्रीनिवासराव अंबेरकर

८. नामजपामुळे रागाचे प्रमाण उणावणे

‘गेल्या आठवड्यात मी घरी एकटाच होतो आणि काही कारण नसतांना मला पुष्कळ राग येत होता. त्या वेळी संगणकावर नामजप चालू करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि त्यानुसार नामजप चालू केल्यावर केवळ ५ मिनिटांतच मला शांत वाटले. माझा राग १०० टक्के गेला नसला, तरी तो ७० ते ८० टक्के एवढा उणावला आहे. नामजपामुळे मला खरोखरच लाभ झाला आहे.’ – श्री. कार्लाेस ब्रिटानिया

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक