कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या दोन वर्षांत केवळ ७ भूखंडच राज्याबाहेरील लोकांनी घेतले विकत !

सातही भूखंड जम्मू भागामधील, तर काश्मीरमध्ये एकाही भूखंडाची खरेदी नाही !

यातून हेच स्पष्ट होते की, कलम ३७० रहित करूनही आणि प्रतिदिन जिहादी आतंकवाद्यांना सुरक्षादलांकडून ठार करण्यात येत असूनही ‘काश्मीर अद्याप भारतियांना रहाण्यास सुरक्षित नाही’, अशीच भावना नागरिकांमध्ये असल्याने तेथे कुणी संपत्ती खरेदी करण्यास इच्छुक नाही. याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर या राज्याबाहेरील लोकांनी एकूण ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे भूखंड जम्मू भागामधील आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभा एका प्रश्‍नावर लेखी उत्तरात दिली. कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीर राज्याबाहेरील नागरिक येथील भूमी विकत घेऊ शकत नव्हते. ३७० कलम लागू असेपर्यंत काश्मीरला वेगळी राज्यघटना होती, तसेच मालमत्ता हक्क आणि अन्य मूलभूत अधिकार यांविषयी वेगळे कायदे होते.