‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देणार ! – ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय

सातारा, ११ डिसेंबर (वार्ता.) – अन्नपदार्थांसाठी शासकीय कार्यप्रणाली असूनही ‘हलाल सर्टिफिकेशन’सारखी समांतर व्यवस्था अस्तित्वात आणली जात आहे. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असून अनेक उत्पादने ‘हलाल सर्टिफिकेशन’ घेत आहेत. यामुळे आता ‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देण्याचा निश्चय नागठाणे (जिल्हा सातारा) येथील हिंदुत्वनिष्ठांनी बैठकीमध्ये केला.

नागठाणे विभागातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. प्रवीण भोसले आणि श्री. अनिकेत नलवडे यांनी ‘हलाल सर्टिफिकेशन आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी नागठाणे आणि पंचक्रोशीतील  हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. भक्ती डाफळे यांनी दिशादर्शन केले.

या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘झटका’ पद्धतीची मटणाची दुकाने चालू करण्याविषयी जनजागृती करण्याचा निश्चय केला, तसेच याविषयी शासकीय पातळीवर कोणती कार्यपद्धत आहे ?, याविषयी जाणून घेतले. जीवनामध्ये दैनंदिन साधनेचे महत्त्व, कोणती उपासना केली पाहिजे, धर्मशिक्षण आदी विषयांवरही चर्चा झाली.

‘ऑनलाईन’ बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. प्रवीण भोसले आणि श्री. अनिकेत नलवडे यांनी गावातील युवतींसाठी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची मागणी केली.