‘युनिव्हर्सल पास’ असणार्‍यांना आता ‘यु.टी.एस्. मोबाईल ॲप’च्या माध्यमातून लोकलगाड्यांचे ऑनलाईन तिकीट काढता येणार !

(टीप : १. युनिव्हर्सल पास म्हणजे ज्यांचे कोरोनाप्रतिबंधक लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना देशभर प्रवास करण्यासाठी दिले जाणारे ओळखपत्र
२. यु.टी.एस्. ॲप म्हणजे मुंबई लोकलगाड्यांसाठी ऑनलाईन तिकीट देणारे ॲप)

मुंबई – ज्यांनी कोरोना प्रतिबंधक २ डोस घेतले आहेत, त्यांना १४ दिवसांनंतर प्रवास करण्यासाठी ‘युनिव्हर्सल पास’ दिला जातो. त्यामुळे आता ‘युनिव्हर्सल पास’ असणार्‍या सामान्य नागरिकांना लोकलने दैनंदिन प्रवास करण्याची मुभा मिळाल्यावर रेल्वेस्थानकांतील खिडक्यांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ लागली. त्यामुळे २४ नोव्हेंबरपासून रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई लोकलचे ऑनलाईन तिकीट देणारे, कोरोनाच्या काळात बंद असलेले, ‘यु.टी.एस्. मोबाईल ॲप’ हे ‘युनिव्हर्सल पास’शी ‘लिंक’ करून पुन्हा चालू केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात हे ॲप बंद करून रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीवरून अत्यावशक सेवा करणार्‍यांसाठी मासिक पास दिला जात होता. त्यानंतर ज्यांच्याजवळ ‘युनिव्हर्सल पास’ आहे त्यांना रेल्वे स्थानकातील खिडकीतून पास आणि नंतर काही काळाने तिकीट देण्यात येत होते. आता ऑनलाईन सुविधा चालू झाल्याने रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीच्या समोरील रांगेत प्रवाशांना तिष्ठत थांबावे लागणार नाही.