स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुण पिढीला भावतील याची विरोध करणार्‍यांना भीती ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेले विचार तरुण पिढीला भावतील, याची लांगूलचालनाचे राजकारण करणार्‍यांना भीती वाटत असल्याने त्यांनी विरोध चालू केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ‘मी सावरकर मंच’ आणि ‘हिंदवी स्वराज्य महासंघ’ यांच्या वतीने केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड प्रेव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सावरकरांचे विचार तरुण पिढीला पटतील, ते विचार कृतीत उतरवण्यासंबंधी आग्रही होतील आणि शासनकर्त्यांना जाब विचारतील याची विरोध करणार्‍यांना भीती आहे. त्यामुळेच सावरकरांसंदर्भात अपप्रचार होत आहे, असेही पाटील म्हणाले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आत्मसात् केले असते, तर फाळणी टाळता आली असती. घटनेतील ३७० कलम हटवल्याने आणि राममंदिराच्या पुनर्बांधणीचे काम चालू झाल्याने सावरकर युगाचा उदय होत आहे’, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

श्री. उदय माहुरकर

सावरकरांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या विचारांची कार्यवाही करणे आवश्यक होते, असे मत माहुरकर यांनी व्यक्त केले; तर सावरकरांचे साहित्य तरुण पिढीच्या विसरून गेलेल्या चेतना जागृत करतील, असा विश्वास अन्य एका वक्त्याने व्यक्त केला.