आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘पेपरलेस’ (कागदरहित) करण्याचा आयोजकांकडून प्रयत्न

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – सध्या गोव्यात चालू असलेला ५२ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘पेपरलेस’(कागदाचा वापर न करता) करण्याचा प्रयत्न या महोत्सवाचे आयोजन करणार्‍या गोवा मनोरंजन सोसायटीने केला आहे. या ५२ व्या चित्रपट महोत्सवाची तिकिटे प्रत्यक्ष न देता ऑनलाईन पद्धतीने भ्रमणभाषवरून दिली आहेत. तसेच या सोहळ्यात सहभागी होणार्‍या प्रतिनिधींना सोहळ्याविषयी माहिती पुस्तिकेद्वारे न देता ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आली आहे. या महोत्सवातील निमंत्रितांना निमंत्रणे डिजिटल पद्धतीनेच पाठवली जातील.

याविषयी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘‘आम्ही कागद वाया घालवणे टाळण्यासाठी डिजिटल पद्धतीचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची जागा प्लास्टिकमुक्त, कागदमुक्त आणि ध्वनीप्रदूषणमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. जुन्या पिढीतील बहुतांश जणांना या पद्धतीची सवय करावी लागणार आहे.

महोत्सवाच्या स्थळी पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घालून त्याऐवजी काचेच्या बाटल्यांतून पाणी देण्यात येत आहे.’’