विश्वव्यापी आकाशापेक्षा पिता हाच श्रेष्ठ !

यक्ष आणि युधिष्ठिर संवाद (प्रतिकात्मक छायाचित्र)

‘यक्ष : आकाशापेक्षा मोठे काय ?

युधिष्ठिर : पिता

आकाश म्हणजे अंतराळ, पोकळी, मधला अवकाश, पोकळ स्थान (जागा), पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी शेवटचे महाभूत. हे महाभूत ‘शब्दगुणक’ म्हणून ओळखले जाते. आकाश म्हणजे ‘विभू’ अर्थात् सर्वव्यापी अनंत अवकाशरूप तत्त्व !

छांदोग्य उपनिषदाने आकाशाला ‘सर्व जगाचे उत्पत्तीकारण मानले आहे.’ या विश्वाची गती काय होईल ? असा प्रश्न प्रवाहण जैवलीला विचारला असता त्याने उत्तर दिले –

आकाश इति होवाच ।
सर्वाणि ह वा इमानि भूतान्याकाशादेव समुत्पद्यन्त
आकाशं प्रत्यस्तं यन्ति ।
आकाशो हि एव एभ्यो ज्यायान् । आकाशः परायणम् ।

– छांदोग्य उपनिषद, अध्याय १, खंड ९, श्लोक १

अर्थ : प्रवाहण म्हणतात, ‘‘आकाशच या पृथ्वीलोकाचा आश्रय आहे. सर्व भूते आकाशापासून उत्पन्न होतात आणि शेवटी आकाशातच विलीन होतात. या जगात आकाशच सर्वश्रेष्ठ आहे. तेच शेवटचे परमस्थान होय.’’

वैशेषिक दर्शनामध्ये एकूण नऊ ‘द्रव्ये’ मानली आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, आत्मा आणि मन ही ती नऊ द्रव्ये होत. यांपैकी ‘आकाश’ हे पाचवे द्रव्य आहे. हे विभू अर्थात् सर्वव्यापी द्रव्य असून ते सर्व कालांमध्ये स्थिर आणि अढळ असते.

आकाशाला ‘शब्दगुणक’ असे म्हणणे !

आकाश म्हणजे अवकाश, पोकळी, आपल्या हृदयाला ‘हृदयावकाश’ असे म्हणतात. आकाश अनंत आहे. प्रचंड आणि अनाकलनीय आहे. पक्षी किंवा माणूस कितीही उंचच उंच गेले, तरी त्यांना आकाशाला स्पर्श करता येत नाही, उलट ते ‘दशांगुळे’ वरच रहाते. ‘आकाश कुठेतरी पृथ्वीला टेकलेले असावे’, असे जे वाटते, तो भ्रम असतो. आकाशरूपी पोकळी आपल्या शरिरातही असते; म्हणून आपल्याला ध्वनी, नाद आणि शब्द प्रकट करता येतो. त्यामुळे आकाशाला ‘शब्दगुणक’ म्हटले आहे.

अमरकोशातील आकाशाची काही नावे- द्यो, दिव, अभ्र, व्योम, पुष्कर, अम्बर, नभ, अन्तरिक्ष, गगन, अनन्त, रव, सुरवर्त्मन.

अशा ‘सर्व विश्वाला व्यापून टाकणार्‍या आकाशापेक्षाही पिता श्रेष्ठ’, असे युधिष्ठिराने यक्षाला सांगितले आहे.

अमरकोशात वडिलांना ‘तात’, ‘जनक’ आणि ‘पिता’ अशी नावे आहेत. पित्याचे श्रेष्ठत्व सांगणारी अनेक वचने रामायण आणि महाभारत यांमध्ये आलेली आहेत. पितृभक्त मुलांच्या कथाही पुराणात आणि संस्कृत साहित्यातून आढळतात. प्रत्येक मुलाने, पुत्राने आपला पिता, जनक, तात यालाच दैवत मानून त्याची मनोभावे सेवा करावी. वृद्ध आणि व्याधीग्रस्त पित्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याला वृद्धाश्रमात पाठवून मुलाने पापातच वाढ केलेली असते, हे तरुणांनी कधीही विसरू नये.’

– दाजी पणशीकर (संदर्भ : सामना, ३०.५.२०१०)