धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वेच्या ‘श्री रामायण यात्रा’ विशेष रेल्वे गाडीला प्रारंभ !

नवी देहली – आय.आर्.सी.टी.सी.ने (‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वे गाडीची योजना आखली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे. ही यात्रा गाडी देहलीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून सोडण्यात आली. येथून ही रेल्वे भगवान श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणी जाणार आहे.

१. या रेल्वेचा पहिला थांबा अयोध्येला असणार आहे. येथील नंदीग्राममधील भारत मंदिर, श्री रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान गढी मंदिर या मंदिरांना यात्रेकरू भेट देतील. यानंतर बिहारमधील सीतामढीला गेल्यावर जनकपूर येथील श्री राम जानकी मंदिराला भेट देता येणार आहे. यानंतर यात्रेकरू वाराणसीला मार्गस्थ होतील. वाराणसीहून प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट येथे यात्रेकरूंना जाता येणार आहे. यानंतर नाशिकलाही नेण्यात येईल. तेथे त्र्यंबकेश्‍वर मंदिर आणि पंचवटी या ठिकाणी यात्रेकरू भेट देतील. यानंतर यात्रेकरू हंपीला मार्गस्थ होतील. हंपीमध्येच किष्किंधा हे प्राचीन शहर होते. यानंतर यात्रेकरू या दौर्‍याचे शेवटचे ठिकाण असलेल्या रामेश्वरमसाठी मार्गस्थ होतील.

२. या यात्रेसाठी द्वितीय श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी प्रति व्यक्ती ८२ सहस्र ९५० रुपये आकारण्यात येणार आहे, तर प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यासाठी प्रति व्यक्ती १ लाख २ सहस्र ९५ रुपये आकारले जातील. यामध्ये यात्रेकरूंना वातानुकूलित उपाहारगृहांमध्ये रहाण्याची सोय, जेवण, प्रेक्षणीय स्थळांसाठी वातानुकूलित वाहने आणि प्रवास विमा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.