‘क्रूझ’वरील कारवाईचे अन्‍वेषण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक संजय सिंह मुंबईत

संजय सिंह

मुंबई – ‘क्रूझ’वरील कारवाईचे अन्‍वेषण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक संजय सिंह हे देहली येथून मुंबईमध्‍ये आले आहेत. महाराष्‍ट्रातील अमली पदार्थविरोधी कारवाईतील ६ प्रकरणांचे अन्‍वेषण ते करणार आहेत. यामध्‍ये आर्यन खान यांची अटक आणि अल्‍पसंख्‍याकमंत्री नवाब मलिक यांच्‍या जावयाची अटक या प्रकरणांचाही समावेश आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबईतील विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्‍याकडे यापूर्वी या प्रकरणांचे अन्‍वेषण होते. आर्यन खान याच्‍या अटकेच्‍या प्रकरणी समीर वानखेडे यांनी ८ कोटी रुपयांची लाच मागितल्‍याचा आरोप या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केल्‍यानंतर समीर वानखेडे यांना चौकशीसाठी देहली येथे बोलावण्‍यात आले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्‍याकडून अन्‍वेषण काढून घेण्‍यात आल्‍याचे म्‍हटले आहे; मात्र अमली पदार्थविरोधी पथकाकडून समीर वानखेडे यांना चौकशीतून हटवण्‍यात आले नसून त्‍यांचे सहकार्य घेऊनच अन्‍वेषण करण्‍यात येणार असल्‍याचे म्‍हटले आहे.