‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंच’च्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले !

केडगाव (ता. दौंड, जिल्हा पुणे), २८ ऑक्टोबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंचाच्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ‘स्वा. सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधरपंत नारगोलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अलौकिक कार्याची माहिती, त्यांचे चरित्र लोकांपर्यंत पोचावे, तसेच हिंदु राष्ट्राविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाची निर्मिती गेल्या १८ वर्षांपासून केली जात आहे.

२४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास मुंबई येथील हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री विकास देशपांडे, पंकज परब, विजय जोशी, तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्य सौ. राणीताई शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. दयानंद बंडगर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंच’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी संघटनेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा मांडला. डॉ. लोणकर पुढे म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’ गेली २० वर्षे अव्याहतपणे स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत आहे. देशभरात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि अन्याय यांना वाचा फोडणे अन् हिंदु राष्ट्राची अत्यावश्यकता या संदर्भात जनजागृती करणे, हे संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न अविरत चालू रहातील, असे त्यांनी सांगितले.

सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्री. नारगोलकर म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे साधनारत असायचे. अंदमानात बंदीवासात असतांनासुद्धा त्यांची उपासना चालू असायची. आजच्या प्रत्येक हिंदूने सावरकर यांचा आदर्श समोर ठेवून साधना केली पाहिजे.’’

हिंदुत्वनिष्ठ श्री. विकास देशपांडे यांनी ‘लव्ह जिहाद’ या समस्येवर कार्य करतांना आलेले त्यांचे अनुभव सर्वांसमोर मांडले. ‘आपल्या गावातील एकही मुलगी लव्ह जिहादला बळी पडणार नाही, याचे दायित्व धर्माभिमानी हिंदूंनी घेतली पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले. आभार प्रदर्शन आणि संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने प्रकाशन सोहळ्याची सांगता झाली.