कोकण रेल्वेमार्गावर कोकिसरे येथे भुयारी मार्गाच्या कामाला तब्बल १० वर्षांनंतर प्रारंभ होणार

प्रमोद जठार

वैभववाडी – तालुक्यातील कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून होणार्‍या भुयारी मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारने ६५ कोटी रुपये निधी दिला आहे. भूमीची मोजणी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाऊन वर्ष २०२२ च्या फेब्रुवारी-मार्च या मासांत भुयारी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. १० वर्षांचे अथक प्रयत्न आणि पाठपुरावा यांमुळे या भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. हे काम करतांना भूमीच्या मालकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.

कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ मान्यता मिळालेल्या भुयारी मार्गासाठीच्या भूमी मोजणीच्या कामाचा शुभारंभ कोकिसरे येथे माजी आमदार जठार यांच्या हस्ते झाला. या वेळी भाजपचे वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, कोकिसरेचे सरपंच दत्ताराम सावंत आदी उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार जठार म्हणाले, ‘‘कोकण रेल्वेमार्गावरून प्रतिदिन ६० गाड्या ये-जा करत असतात. त्यामुळे एकूण ९ ते १० घंटे हे फाटक बंद ठेवावे लागते. त्यामुळे येथून कोल्हापूरला जाणारे प्रवासी, वाहनचालक, रुग्ण आदींची असुविधा होत आहे. भुयारी मार्ग झाल्यास प्रवास करणे सोयीचे होणार आहे, असे जठार यांनी सांगितले.रेल्वे