महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सोलापूर येथील ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम राबवला जाण्याची शक्यता !

सोलापूर – येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेऊन राबवलेल्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमामुळे जिल्ह्यातील २ सहस्र ५०० शाळांचे स्वरूप पालटले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. २ दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची ‘झूम ॲप’द्वारे ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेने राबवलेल्या ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. सोलापूर जिल्हा परिषदेने केलेल्या कामगिरीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी कौतुकाची थाप मारत सोलापूर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दीड ते दोन वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि त्यांच्या समुहाने जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान हाती घेतले. शासनाचा एकही रुपया न घेता, लोकवर्गणीतून शाळांचे स्वरूप पालटण्याचा प्रयत्न करण्यात आहे. शेजारच्या गावातील स्वच्छ आणि सुंदर शाळा पाहून गावागावांमध्ये या अभियानाविषयी चुरस निर्माण झाली. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी गावातील प्रत्येकाला या अभियानाने दिल्याने उपक्रमासाठी शिक्षकांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांचाच मोठा हातभार लागला.

सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या अभियानाला ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ! – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

प्रत्येकाला स्वत:चे घर आणि शाळा यांविषयी आपुलकीची भावना असते. ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेसाठी काहीतरी योगदान द्यावे. सोलापूर जिल्ह्यात राबवलेल्या या अभियानाला ग्रामस्थ आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाला मिळालेल्या प्रचंड लोकसहभागामुळे जिल्ह्यातील शाळांचे चित्र आज पालटले आहे.