आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाविषयी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! – माधव भंडारी, भाजप

श्री. माधव भंडारी

मुंबई – आरोग्य विभागाच्या परीक्षेत तिसर्‍यांदा गोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप झाला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच उत्तरदायी असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने मागील परीक्षा घेण्याचे कंत्राट ‘न्यासा’ या आस्थापनाला देण्यात आले होते. आस्थापनाने केलेल्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर ओढावली. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र येथील सरकारांनी आस्थापनाला काळ्या सूचीत टाकले होते; मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे पुन्हा याच आस्थापनाला परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले.

२४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या या परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिका न मिळणे, काही विद्यार्थ्यांना सकाळच्या परीक्षेसाठी एक केंद्र, तर दुपारच्या परीक्षेसाठी दुसर्‍या जिल्ह्यातील केंद्र दिले होते. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ असणे, मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवरही गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. नाशिक येथे खासगी वाहनांतून प्रश्नपत्रिका आणल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षा प्रक्रियेविषयी संशय व्यक्त होत असल्याने ‘परीक्षा नव्याने घेण्यात याव्यात’, असेही भंडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.