मुंबई – अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाच्या सेवेत आल्यापासून मी कधीच दुबईला गेलो नाही. मी माझ्या बहिणीसह मालदीव येथेही गेलो नाही. मी शासनाकडून अधिकृत रजा घेऊन माझ्या पैशाने कुटुंबासह सहलीला गेलो. माझी बहीण स्वतंत्रपणे मालदीवला गेली होती. मलिक वारंवार माझ्या कुटुंबातील महिलांना लक्ष्य करत आहेत, हे चुकीचे आहे. याविषयी मी लवकरच कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे, असे उत्तर अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी मालदीव येथे जाऊन अमली पदार्थविरोधी कारवाया आधीच निश्चित केल्याचा आरोप केला आहे, तसेच वानखेडे यांना वर्षभरात कारागृहात टाकण्याची धमकीही दिली आहे.