लालबाग (मुंबई) येथील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग !

  • सुरक्षारक्षकाचा १९ व्या मजल्यावरून पडून मृत्यू !

  • उंच इमारतीपर्यंत पोचणारी यंत्रणा अग्निशमनदलाकडे उपलब्ध नाही !

मुंबई – लालबाग येथील ‘वन अविघ्न पार्क’ या ६० मजली इमारतीला २२ ऑक्टोबर या दिवशी भीषण आग लागली. अग्निशमनदलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे सायंकाळी उशिरा आग नियंत्रणात आली. आग लागल्यावर अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी पोचली; पण इमारतीपर्यंत पोचण्याचा रस्ता अत्यंत निमुळता असल्यामुळे अग्निशमनदलाला इमारतीपर्यंत पोचण्यास विलंब लागला.

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी इमारतीमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती दिली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की, काही वेळातच आग ५ व्या मजल्यापर्यंत पसरली. आग लागल्यावर १९ व्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाने गॅलरीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला; मात्र हात सुटून तो खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

आग लागलेल्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे पोचलेच नाहीत !

आग लागलेल्या इमारतीपर्यंत जाण्याइतका रूंद रस्ता नसल्यामुळे अग्निशमन यंत्रणा इमारतीपासून काही अंतरावर उभी करावी लागली. तेथून पाण्याचा फवारा मारण्यात आला; मात्र आग लागलेल्या १९ व्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे पोचलेच नाहीत. त्यामुळे आगीची तीव्रता वाढत गेली.

उंच इमारतींपर्यंत पोचणारी यंत्रणा अग्निशमनदलाकडे उपलब्ध नाही !

मुंबईतील अग्निशमन दलाकडे आग विझवणार्‍या सर्वांत उच्च यंत्रणेची उंची ९० मीटर आहे. त्यातून पाण्याचा फरावा १५ मीटरपर्यंत आणखी वर जातो. यामुळे अधिकाधिक तिसाव्या मजल्यापर्यंत पाण्याचे फवारे पोचतात; मात्र मुंबईतील अनेक इमारती गगनचुंबी आहेत. ‘वन अविघ्न पार्क’ ही इमारत ६० मजल्यांची आहे. त्यामुळे अशा उंच इमारतींमधील वरील मजल्यांना आग लागल्यास तिथपर्यंत पोचणारी यंत्रणाच मुंबईतील अग्निशमनदलाकडे उपलब्ध नाही. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडल्यास हे धोकादायक असून यावर सरकारने तातडीने उपाययोजना काढणे आवश्यक आहे.