५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बदलापूर येथील कु. श्लोक राकेश परचुलकर (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. श्लोक परचुलकर हा एक आहे !

कु. श्लोक परचुलकर
सौ. मनाली परचुलकर

१. जन्मापूर्वी

१ अ. नऊ मासांची गरोदर असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नाडीपट्टीवाचन सोहळा पहातांना गर्भाची हालचाल जाणवून चैतन्य जाणवणे : ‘मी नऊ मासांची गरोदर असतांना परात्पर गुरुमाऊली यांचा नाडीपट्टीवाचन सोहळा झाला. नाडीपट्टीवाचनात ‘हा सोहळा गरोदर स्त्रिया पहात आहेत. त्यांनाही या सोहळ्याचा लाभ होणार आहे’, असे सांगितले गेले. तेव्हा मला पोटामध्ये हालचाल जाणवली आिण वेगळेच चैतन्य जाणवले.

२. जन्म ते ४ वर्षे

२ अ. शांत : श्लोकने जन्मापासून उगाचच रडणे हा त्रास दिला नाही. श्लोक १ ते २ वर्षांचा असतांना त्याला अनोळखी व्यक्तीने घेतले, तरी तो रडत नसे. त्याला परात्पर गुरुदेवांच्या सोहळ्याला नेल्यानंतर तो तिथे त्रास न देता शांत झोपायचा.

२ आ. सहनशील : तो चालतांना पडला किंवा त्याला लागले, तरी तो जास्त रडत रहायचा नाही.

२ इ. स्वावलंबी : श्लोक स्वतःची कामे स्वतः करायचा प्रयत्न करतो. मीराच्या (बहिणीच्या) समवेत तोसुद्धा छोटी छोटी कामे करतो.

२ ई. सात्त्विकतेची आवड

१. त्याला देवाची पूजा करणे, घंटा वाजवणे आणि आरती करणे आवडते. दिव्यांची अमावास्या, श्री गणेशचतुर्थी, लक्ष्मीपूजन यांसारख्या सण-उत्सवात देवतांची मांडणी केल्यावर तो मनोभावे नमस्कार करतो. त्याला औक्षण करून घ्यायला आवडते.

२. दळणवळण बंदीच्या (‘लॉकडाऊन’च्या) काळात मी करत असलेले मंत्रजप आणि नामजप तोही करतो. माझा एखादा शब्द चुकला, तर तो मला योग्य शब्द सांगतो. भ्रमणभाषमधील देवीकवच आणि बगलामुखीदेवीचे स्तोत्र लावतो.

३. श्लोकला परात्पर गुरुमाऊली यांच्या ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथातील चित्रे पहायला आवडतात.

२ उ. स्वतःच्या चुकीसाठी क्षमायाचना करणे आणि इतरांची चूकही तत्परतेने दाखवून देणे : एकदा त्याने त्याच्या ताईच्या पोटावर मारले. नंतर त्याला कळले की, ताईच्या पोटात दुखत आहे. तेव्हा त्याला त्याचे वाईट वाटले आणि त्याने ‘‘ताईला पुन्हा पोटावर मारणार नाही’’, असे सांगितले.

मी मीराला (मुलीला) किंवा त्याला रागावले, तर तो मला सांगतो, ‘‘मी आणि ताई लहान आहोत ना ? त्यामुळे आम्हाला असे रागावू नको.’’ काही कारणाने मी चिडचीड करत असेन, रागावले असेन, तर तो माझ्या आजूबाजूला राहून सतत हसवण्याचा प्रयत्न करतो.

२ ए. प्रेमभाव : त्याला लहानपणापासूनच सर्वांचा लळा आहे. घरात किंवा बाहेर कोणाला काही लागले, तर तो औषध लावतो आणि फुंकर घालतो. तो इतरांची काळजी घेतो. त्याच्या लाघवी बोलण्यामुळे तो आमचे नातेवाईक आणि इमारतीत रहाणारे या सर्वांचा लाडका आहे.

३. स्वभावदोष

मस्ती करणे, भ्रमणभाष पहाणे, राग आल्यावर वस्तूंची फेकाफेक करणे.’

– सौ. मनाली राकेश परचुलकर, बदलापूर (१९.६.२०२०)