परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनानंतर दु:खद आयुष्याला कलाटणी मिळून साधनामार्गावर आनंदाने वाटचाल करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवद आश्रमातील सौ. जयमाला पडवळ (वय ६६ वर्षे) !

जीवनातील एका कठीण प्रसंगामुळे निराशा आलेली असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद (पनवेल) आश्रमातील सौ. जयमाला पडवळ यांच्या जीवनाला कलाटणी कशी मिळाली ? याविषयी, तसेच त्यांचा पुढील साधनाप्रवास येथे देत आहोत. २२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण यातील काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया !

सौ. जयमाला पडवळ

मागील लेखाचा वाचण्यासाठी पुढील लींक पहा : https://sanatanprabhat.org/marathi/520998.html

४. कुलदेवी कळणे आणि तिचे दर्शन घडणे

४ अ. त्याच रात्री स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले सभेत बोलतांना दिसून त्यांच्यामागे एका देवीचे दर्शन होणे आणि नंतर कुलदेवीच्या मंदिरात गेल्यावर स्वप्नात दिसलेली देवी तीच असल्याचे लक्षात येणे : त्या रात्री मला स्वप्न पडले. स्वप्नात मला परात्पर गुरु डॉक्टर सभेत बोलत असल्याचे दिसले. त्यांच्यामागे कोणीतरी एक देवी होती. मी त्या देवीला झोपेतच हात जोडले. सकाळी ६ वाजले, तरी मी उठले नाही; म्हणून सासूबाईंनी मला उठवले. मी जागी झाले, तेव्हा माझे हात जोडलेलेच होते. मी सासूबाईंना म्हटले, ‘‘मी आज कामावर जाणार नाही.’’ त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रवचनात ऐकलेला सर्व भाग मी सासूबाईंना सांगून त्यांना कुलदेवतेविषयी विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘नानवडे गावची भूमिकादेवी ही आपली कुलदेवता आहे.’’ मी त्यांनाही कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगून ‘‘त्यामुळे आपल्या दोघींच्या नशिबी असलेले दुःख भोगण्याची ताकद मिळेल’’, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी मी नानवड्याच्या भूमिकादेवीच्या मंदिरात गेले. माझी दृष्टी मूर्तीवर पडली आणि काय आश्चर्य ! ‘स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागे उभी असलेली देवी तीच होती’, हे माझ्या लक्षात आले.

४ आ. कुलदेवीचे दर्शन घेतल्यावर ती पाठीवरून हात फिरवून तिच्या पदराने साधिकेचे अश्रू पुसत असल्याचे तिला जाणवणे आणि सूक्ष्मातून देवीला आत्मनिवेदन करत असतांना भावाश्रूंचा अभिषेक होऊन सर्व अंग शहारणे : मी देवीचे रूप डोळे भरून पाहिले. डोळ्यांत साठवले. आईला सांगतो, तसे आतापर्यंत झालेला सर्व वृत्तांत मी देवीला सांगितला. तेव्हा ‘देवी माझे बोलणे पूर्णपणे ऐकून घेत आहे’, असे मला वाटत होते. ‘ती माझ्या पाठीवरून हात फिरवत आहे. माझे अश्रू तिच्या पदराने पुसत आहे’, असे मला जाणवले. मी तिला आत्मनिवेदन करत असतांना माझ्या डोळ्यांतील अश्रूंनी देवीच्या चरणी अभिषेक होत होता. माझे पूर्ण अंग शहारले. मी बसून नामजप करू लागले. त्या दिवसांपासून मी आणि सासूबाई दोघीही कुलदेवीचा नामजप करू लागलो. त्यामुळे घरातील वातावरणात हळूहळू पालट होऊ लागले आणि दुःखाचा आवेग अल्प होऊ लागला.

५. सनातनचा सत्संग लाभून साधनेला आरंभ होणे

५ अ. सनातन संस्थेच्या सत्संगाला जाणे आणि त्यानंतर विविध प्रकारच्या सेवा करण्यास आरंभ केल्यावर आनंद मिळणे : त्यानंतर मी सनातनच्या सत्संगाला जाण्यास आरंभ केला. १४.४.१९९७ या दिवशी माझा पहिला सत्संग होता. तेथेही सत्संगाचा विषय ‘प्रारब्ध’ होता. सत्संग घेणारे साधक सांगत होते, ‘जीवनात येणारी दुःखे ही मागच्या जन्माच्या पापकर्मानुसार येत असतात. प्रारब्ध कुणालाच चुकलेले नाही. साधनेने केवळ ते भोगण्याची ताकत मिळते; परंतु त्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे.’ सत्संगातील प्रत्येक शब्द माझ्या अंतर्मनात जात होता. आजचा सत्संग जणू माझ्यासाठी होता. त्या दिवसापासून माझ्या साधनेला आरंभ झाला.

५ आ. सत्सेवेत आनंद मिळणे : पुढे सत्सेवा चालू झाली. त्यातील आनंद मला मिळायला लागला. मी साप्ताहिक सनातन प्रभातच्या वितरणाच्या सेवेला जायला लागले. अर्पणाचे महत्त्व कळल्यावर मी स्वत: अर्पण करू लागले आणि इतरांकडूनही मिळवू लागले. थोड्या दिवसांनी बांदा केंद्राच्या साप्ताहिक सनातन प्रभातची आणि गुरुपौर्णिमेची सेवा करू लागले. सत्संग घेणे, गावागावात जाऊन प्रसार करणे, या सेवा चालू झाल्या. ४.४.१९९९ या दिवशी ‘गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दैनिक सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू झाली. त्यानंतर मला ‘‘तुम्हाला मडगाव येथे सेवेसाठी जायचे आहे. तेथे सर्व मुलेच आहेत. तेथेच राहून तुम्हाला मुलांसाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करायची आहे’, असे सांगण्यात आले.

५ इ. मडगाव येथील सेवाकेंद्र आणि त्यानंतर कुडाळ सेवाकेंद्र येथे स्वयंपाकघरात सेवा करणे अन् कुडाळ आश्रमातील पू. रेडकरआजी यांच्याकडून साधनेसंदर्भात अनेक गोष्टी शिकायला मिळणे : मी मडगाव येथील सेवाकेंद्रात स्वयंपाकाची सेवा करू लागले. सहसाधक मला स्वयंपाकात साहाय्य करायचे. त्यानंतर मी नोकरीचे त्यागपत्र (राजीनामा) दिले. नंतर साधारण वर्षभराने मी कुडाळ आश्रमात आले. तेव्हा मला विज्ञापनाची आणि साप्ताहिक सनातन प्रभातची सेवा मिलाली. मला संगणकाचे पुरेसे ज्ञान नव्हते.

त्यानंतर मी कुडाळ सेवाकेंद्रात स्वयंपाकघराचे दायित्व सांभाळू लागले. माझी देवावरची श्रद्धा वाढली. देव माझ्याकडून सर्व करवून घेत होता. त्या वेळी मला पू. रेडकरआजी यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. प्रत्येक टप्प्यावर मी पुढे जाण्यासाठी त्या तत्त्वनिष्ठ राहून मला साहाय्य करत होत्या. माझ्या आजारपणात पू. आजी माझी काळजी घ्यायच्या.

६. रुग्णाईत झाल्याने मुंबई येथे भावाच्या घरी उपचारासाठी दोन मास (महिने) रहाणे आणि नंतर देवद आश्रमात जाणे

नंतर परत मी रुग्णाईत झाले. आजारपणातून उठल्यावर स्वयंपाकघरातील सेवा मला जमणार नाही; म्हणून मला नेसाई सेवाकेंद्रात ग्रंथांच्या संबंधित सेवा करण्यास पाठवले; पण माझे आजारपण वाढतच गेले. पाठीच्या मणक्यांतील ‘गॅप’ कमी झाली होती. कमरेचा आणि लघवीचाही त्रास पुष्कळ वाढला होता. मी काहीच सेवा करू शकत नव्हते. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोव्यात राहूनच उपचार करण्यास सांगितले. बांबोळी रुग्णालयात उपचार घेऊनही काही फरक न पडल्याने मला ‘आपले ओझे आश्रमावर नको’, असे वाटू लागले. नंतर माझ्या भावाला माझ्या आजारपणाविषयी कळले आणि त्याने मला मुंबईला बोलावून घेतले. मी भावाच्या घरी २ मास राहून उपचार केले. माझ्या प्रार्थना आणि नामजप चालू होता. काही दिवसांनी मला बरे वाटायला लागल्यावर मी माझ्या घरी आले. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी) मला घरी रहाण्यापेक्षा आश्रमात रहाण्यास बोलवले. त्यांच्या समवेत संभाजीनगरला जाण्यासाठी म्हणून मी देवद आश्रमात आले. त्यानंतर स्वातीताईंनी मला ‘सध्या देवद आश्रमात रहा’, असे सांगितले. तेव्हापासून मी देवद आश्रमात राहू लागले.

७. देवद आश्रमात धान्य निवडण्याची सेवा करतांना त्या सेवेविषयी कृतज्ञता वाटणे आणि स्वयंपाक घराच्या सेवेसंदर्भात होणार्‍या सत्संगाला बसण्याची संधी मिळणे

देवद आश्रमात धान्य निवडण्याची सेवा करत असतांना पहिल्याच दिवशी मला त्या सेवेबाबत पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. सेवेवर प्रेम करता येऊ लागले. श्रीकृष्णाला म्हटले, ‘अरे श्रीकृष्णा ! यापेक्षा आणखी सोपी कुठली सेवा मला तू देणार ? या सेवेतूनच जर माझी प्रगती व्हायची असेल, तर मला ही सेवा स्वीकारता येऊ दे.’ येथूनच माझ्या आध्यात्मिक प्रगतीचा पहिला टप्पा चालू झाला. त्यानंतर मला देवाने स्वयंपाकघराच्या सत्संगाला बसण्याची संधी दिली. तेव्हा तर मला ‘सत्संग म्हणजे काय ?’ हेही कळत नव्हते. माझ्यातील अहंमुळे मला सत्संगातील सूत्रांचे आकलन होत नव्हते. तेव्हा मला वाईट वाटायचे. मी श्रीकृष्णाला प्रार्थना करायची, ‘देवा मला काही कळत नाही. मला शिकता येऊ दे. मी एक दगड आहे. या दगडावर कितीही घाव घातलेस, तरी चालतील; पण मला पुढे जायचे आहे.’ एकदा तर पू. (सौ.) अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) यांना मी लिहून दिले, ‘ताई, मला सत्संगातले काही कळत नाही; पण मला शिकायचे आहे, मला साहाय्य करा.’ ताईंनी माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाल्या, ‘‘जमेल तसे प्रयत्न करा. हळूहळू जमेल; पण घाबरू नका.’’

८. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी साधनेत साहाय्य केल्याने त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे

मी प्रत्येक वेळेला श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना करायची. प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्णाला विचारत होते. ‘श्रीकृष्णा, या प्रसंगात मी काय करू ?’ तेव्हा श्रीकृष्ण माझे बोट धरून मला पुढे पुढे नेत होता. पू. (सौ.) अश्विनीताईंनी तत्त्वनिष्ठपणे माझ्या चुका सांगून मला पुढे जाण्याची संधी दिली. माझ्या आध्यात्मिक प्रगतीत पू. ताईंचा मोठा वाटा आहे. आज मी जी काही आहे, ती केवळ ताईंनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आहे.

९. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांना आरंभ केल्यावर व्यापकता येणे आणि धान्य निवडण्याची सेवा करणार्‍या साधकांसमवेतच स्वयंपाक घरात सेवा करणार्‍या साधकांविषयीही प्रेम वाटणे

पूर्वी मला केवळ धान्य निवडण्याची सेवा करणारे साधक ‘माझे’ वाटायचे. त्यानंतर मी हळूहळू व्यापक होऊ लागले. ‘स्वयंपाकघरात पुष्कळ सेवा असतात. त्या साधकांना मी काय साहाय्य करू शकते ?’, असा माझा विचार होऊ लागला. मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करायचे, ‘गुरुदेवा, हे शरीर तुमचे आहे. या देहाचा वापर कसा करायचा, हे सर्व तुमच्याच हातात आहे.’ नंतर मला धान्य विभागासह स्वयंपाकघरही आपले वाटू लागले. तेथील सर्व साधकांविषयी प्रेम वाटू लागले. ‘साधक दुखावतील’, या विचाराने पूर्वी मी साधकांना चुका सांगायला घाबरत होते. नंतर देवाला प्रार्थना करून चुका सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला. साधकांच्या चुका सांगतांनाही देवाला शरण जायचे, ‘देवा, तुझे साधक पुढे जायला हवेत. मला तत्त्वनिष्ठ राहून त्यांच्या चुका सांगता येऊ दे. त्यात माझ्याकडून काही चूक व्हायला नको, नाहीतर मला पाप लागेल.’

१०. सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेले चिंतन

१० अ. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करू लागल्यावर सर्व सेवा आपल्या वाटू लागणे आणि सेवेत देव साहाय्य करत असल्याने कृतज्ञता वाटणे : मला माझ्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काहीही वाटत नसे; कारण ‘देवाने माझा हात पकडला आहे. तो पुढे घेऊन जाणार आहे’, याची मला निश्चिती होती. माझ्या खडतर प्रारब्धावर मात करायला देव मला शिकवत होता. माझ्याकडून प्रार्थना व्हायची, ‘देवा ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने मला सेवा करता येऊ दे. मला माझ्या सेवेवर प्रेम करता येऊ दे.’ त्यातूनच मला सर्व सेवा आपल्या वाटू लागल्या. धान्य विभागाच्या सेवा तातडीच्या असतात. तिथे सर्व वेळेवर करावे लागते. नाहीतर धान्य खराब होऊ शकते. काही वेळा तातडीच्या सेवांसाठी साधकांचे साहाय्य हवे असते. तेव्हा देव कोणाच्यातरी माध्यमातून साहाय्य करतो. मी स्वयंपाकघरात सेवेला जाते, तेव्हा माझ्या धान्य विभागाच्या सेवा पूर्ण झालेल्या असतात. अशा कित्येक अनुभूती मी घेतलेल्या आहेत. ‘माझे सर्व देवच करत आहे’, याची मला जाणीव असते. ‘देव जनाबाईप्रमाणेच या युगात माझ्यासाठी किती करतो !’, या विचारांनी मला रडू येते आणि कृतज्ञता व्यक्त होते.

१० आ. सेवा करत देवाला आळवणे आणि रात्री झोपतांना देवाला आत्मनिवेदन करणे : माझ्याकडून नकळत प्रार्थना होते, ‘देवा सर्वांकडून चुकांविरहीत सेवा होऊ दे.’ स्वयंपाकघरात आमटी आणि भात यांची मोठमोठी पातेली गॅसच्या शेगडीवरून उतरवतांना, तसेच ती पटलावर चढवतांना मला पुष्कळ भीती वाटायची आणि माझ्याकडून देवाला साहाय्यासाठी प्रार्थना व्हायच्या. मग भोजनाच्या पटलावर सर्व वस्तू ठेवल्या गेल्या की, कृतज्ञता व्यक्त व्हायची, ‘हे सर्व देवानेच केले.’ सेवा करत देवाला आळवतांना दिवस कधी संपायचा, ते कळायचे नाही. रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर देवाला आत्मनिवेदन करते. ‘देवा आज मी कुठे चुकले ? कुठे अल्प पडले ? कुठल्या प्रसंगात मला समजून घेता आले नाही ? कुठल्या प्रसंगात माझा कर्तेपणा होता ? कुठे माझे स्वभावदोष उफाळून आले ? देवा या सर्व प्रसंगांत मला क्षमा कर. माझ्यासारखा अनेक व्याधींनी त्रस्त झालेला एक जीव; परंतु त्यावर तू केवढी मोठी जबाबदारी टाकली आहेस. मी तर नुसते माध्यम आहे. माझ्याकडून तूच हे सर्व करवून घेत आहेस. या कृतज्ञतेची मला सतत जाणीव राहू दे. मी तुला संपूर्णपणे शरण आले आहे. मला तुझ्याविना कुणीच नाही.’

१० इ. आत्मनिवेदन आणि प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती : अशा प्रार्थना करून आत्मनिवेदन करतांना सूक्ष्मातून श्रीकृष्णाचा कोमल हात माझ्या डोक्यावरून फिरत असतांना कधी निद्रादेवीची कृपा होते, ते कळत नाही. सकाळी जाग येते, ती वैकुंठेश्वराच्या पावन चरणस्पर्शाने ! तेव्हाही देवाला प्रार्थना होते, ‘देवा आज दिवसभराच्या सर्व सेवा तू या जिवाकडून करवून घे. मला बाजीप्रभूचे बळ दे. तुझी कृपादृष्टी माझ्यावर असू दे. तू सतत माझ्या समवेत रहा; कारण तुझ्याविना मी काही करू शकत नाही.’ मग दिवसभराच्या सेवेला प्रारंभ होतो. स्वयंपाकघरातील साधिकांसाठी प्रार्थना होते, ‘देवा, माझी प्रगती उशिरा झाली, तरी चालेल; पण माझ्या सहसाधिकांची प्रगती आधी होऊ दे. त्या १० – १२ घंटे सेवा करतात, थकतात. त्यांची प्रगती लवकर कर.’ अशा शरणागतीच्या प्रार्थना चालू असतात.

११. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित होणे

वर्ष २०१६ मध्ये एक दिवस मला ‘आज सत्संग आहे’, असे सांगण्यात आले आणि त्या सत्संगात पू. (सौ.) अश्विनीताईंनी माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने तो सोन्याचा दिवस माझ्या आयुष्यात उगवला. या यशामागे माझे काही नसून सहसाधकांच्या शुभेच्छा होत्या. प्रत्येक वेळी परखडपणे चुका सांगून त्यांनी मला मोलाचे साहाय्य केले; परंतु ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे’, हे माझे ध्येय नाही आणि नव्हते. मला पुढे जायचे आहे. यासाठी ‘माझा शरणागत भाव सतत जागृत राहू दे’, अशी मी प्रार्थना करते.

कृतज्ञता

‘हे श्रीकृष्णा, हा जीव तुझ्या चरणी कोटीशः शरणागत आहे. आता तुझ्याकडे मी काय मागावे; कारण तू दिले नाहीस, असे काहीच राहिलेले नाही. आता तर मी सगळ्या गोष्टींनी तृप्त आहे. मला कशाचीही वासना राहिलेली नाही. ‘आयुष्याच्या अंतापर्यंत तू माझ्या समवेत रहावेस’, एवढेच आता मागणे आहे. शेवटी ही शब्दसुमने श्रीकृष्णाच्या चरणांवर ठेवतांना प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) एक भजन ओठांवर येते, ‘शेवटी तुम्हा दीन विनवणी, आश्रय द्या हो तुमच्या चरणी !’  (समाप्त)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

– सौ. जयमाला पडवळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.११.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक